दगडी सुळका अंगावर पडुन एकाचा जागेवर मृत्यू  

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ :  तालुक्यातील  लखमापुरी येथे विहीरीच्या रिगांचे काम सुरू असतांना बुधवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळीवारा आणि पावसापासुन बचाव करण्यासाठी निवाऱ्याला गेलेल्या एका तरुणांचा अंगावर मोठा दगडी सुळका पडुन जागेवर मृत्यू झाला. 

संदिप लहु खंडागळे (वय-२८) असे मयत मजुराचे नाव आहे. लखमापुरी येथील भारत भगवान गावंडे यांच्या विहीरीवर सिमेंट कॉन्क्रीटच्या रिंगा टाकण्याच्या कामांसाठी बोधेगाव येथील संदिप खंडागळे, राहुल कांबळे, सुभाष वैरागळ आणी प्रविण खरात हे चार तरुण गेले होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला.

यापासुन बचाव करण्यासाठी यातील तिघे झाडखाली गेले तर विहीरीच्या लगत असलेल्या खरीपाच्या आडोशाला खंडागळे बसला होता. वारा व पावसाने खरीपाच्या ढिगाऱ्या वरील दगड खंडागळे याच्या अंगावर पडल्याने त्याखाली तो सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार नानासाहेब गर्जे, स्वयंसेवक तरुणांना घेवून घटनास्थळी काही मिनिटात पोहचले.

त्यांनी सर्वांनी ग्रामस्थांच्या मदतीने खंडागळेचा मृतदेह जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला. दरम्यान शेवगावचे तहसिलदार प्रशांत सागडे, पोलीस निरिक्षक दिगंबर भदाणे यांनी फौजफाट्या सह घटनास्थळी धाव घेतली.

मयत खंडागळे हा अत्यंत गरिब, विवाहीत तरुण असून तो बोधेगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे राहत होता. त्याला अल्पवयीन मुलगा व मुलगी आहे. त्याच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.