पोलीसा समक्ष  खुनातील आरोपी पसार 

कोपरगाव पोलीसांचा ढिसाळपणा चव्हाट्यावर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. 3 : कोपरगाव दुय्यम कारागृहात  शिर्डी येथील एका खुन प्रकरणात बंदीस्त असलेला आरोपी योगेश सर्जेराव पारधे हा रविवारी राञी कोपरगावच्या पोलीसासमक्ष पसार झाल्याने कोपरगाव पोलीसांचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील एका हाॅटेलमध्ये मोबाईलची रिंगटोन का वाजवली म्हणून वाद घालीत रिंगटोन वाजवणाऱ्या सागर शेजवळ याचा निर्घृण खून करणारा आरोपी योगेश सर्जेराव पारधे हा कोपरगाव दुय्यम कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात  गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षा भोगत होता.

त्याला श्वसनाचा बऱ्याच दिवसांपासून ञास होता अशातच रविवारी राञी दिड वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक रक्ताची उलटी झाल्याचे पोलीसांना समजले. कारागृहात सुरक्षेसाठी हजर असलेले पोलीस कर्मचारी पिनू बाबुराव ढाकणे यांनी या घटनेची माहीती वरिष्ठ पोलीसांना कळवून योग्य त्या सुरक्षीत बंदोबस्त आरोपी योगेश पारधे याला उपचारासाठी घेवून ज्याण्याऐवजी स्वत: मोटारसायकलवर बसवून कोणतीही दोरी अथवा हातकडी न घालता राञी पावणेदोनच्या दरम्यान ग्रामीण रुग्णाल कोपरगाव येथे घेवुन जात होते.

आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याने त्याने पोलीस कर्मचारी यांच्या मोटारसायकलवर बसला आणि काही अंतरावर मोटारसायकलची  गती कमी होताच उडी मारुन पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांच्या डोळ्यासमोर तो अलगद पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस कर्मचारी ढाकणे यांनी त्यांचा पाठलाग करुन पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाही पण तो आरोपी  रक्ताची उलटी झालेली असतानाही पोलीसांपेक्षा अधिक चपळाईने पळून गेला.

आपल्या हातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच भानावर आलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने राञी दोन वाजता वरिष्ठांना  घटनेची माहीती दिली आणि क्षणात कोपरगाव शहर पोलीसांसह जिल्हा पोलीस प्रशासनाची राञी दोन वाजता झोप उडाली. डोळे चोळत उठलेल्या पोलीसा आरोपीचा शोध घेवू लागले पण तपास काही लागला नाही. 

 या घटने बाबत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले की, शिर्डीच्या बहुचर्चित खुनातील हा आरोपी आजारी असल्याचे सांगितल्याने  त्याला उपचारासाठी घेवून जाताना पलायन केले आहे. त्याच्या  शोधासाठी स्थानिक पोलीसांचे ३ पथक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे खास दोन पथके त्याच्या शोधासाठी  विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत. लवकरच त्याचा शोध घेवू गजाआड  करणार असल्याचे सांगितले आहे. 

 दरम्यान पोलीस कर्मचारी पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी योगेश सर्जेराव पारधे याच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोपरगाव कारागृहातून अट्टल गुन्ह्यातील आरोपी पळुन  जाण्याचा हा पहीला प्रकार नसुन यापुर्वीही अनेकवेळा आरोपी कारागृहा तोडुन पळून गेले आहेत. कोपरगाव शहर पोलीसांचा ढिसाळपणा पुन्हा दिसुन आला आहे.