कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०६ : जगभरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असून, त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे वैभव संकटात सापडले असून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल वेळीच सावरणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. याची जान ठेवून आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मतदार संघातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करून आमदार काळे यांचा वाढदिवस साजरा केला.
कोपरगाव मतदार संघातील बहादरपूर, डाऊच बु. वारी येथील स्मशानभूमी व परिसर, सुशीलामाई काळे महाविद्यालय शहाजापूर, वारी, भोजडे, कोकमठाण, लौकी, तळेगाव मळे, करंजी, आदी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
वृक्ष आपल्याला फक्त सावलीच देत नाहीत तर वृक्षांपासून अनेक फायदे आहेत. पर्यावरणाची भयंकर समस्या संपूर्ण जगासमोर उभी आहे. मानवाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असलेले वृक्ष आपले जीवनदाते असून सर्वांनी वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून, कधी ढगफुटी तर कधी दुष्काळ अशा समस्या नष्ट होऊ शकतील.
आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून सर्व वृक्षांचे योग्य संगोपन करण्याचे आवाहन केले आहे.