कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : गुजरात आयुर्वेद डॉक्टर असोसिएशन यांच्यामार्फत दिला जाणारा “आयुर्वेद गौरव पुरस्कर” गुजरात आयकॉन २०२४ या सुरत येथील कार्यक्रमात कोपरगांव येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. तुषार गलांडे यांना कोपरगांव येथे २३ वर्षापासून करत असलेल्या मुळव्याध, भगंदर व फिशर या आजारांसाठी क्षारसुत्र उपचार पध्दतीसाठी सुरत येथे गुजरात आयुर्वेद विद्यापीठ कुलगुरू डॉ. मुकुल पटेल यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला.
दैनंदिन जीवनातील बदललेल्या खाण्याच्या सवयी व खाण्याच्या बदललेल्या वेळा या आजारांसाठी कारणीभुत आहे. हल्ली जेवण आणि नाष्टामध्ये मैदायुक्त पदार्थ जास्त तरीदार पदार्थ, हरबरा डाळीचे पदार्थ, यांचे प्रमाण वाढत चालले असुन सकाळी उठल्यापासुन ब्रेड, खारी, टोस्ट, मैद्याच्या रोटया पिझा, बर्गर आदि गोष्टींचा आहारात समावेश होतो. त्यामुळे मुळव्याध, भगंदर, फिशर सारखे आजार वाढीस लागत असुन प्रत्येक घरामध्ये त्याचे रूग्ण दिसु लागले आहेत. अगदी लहान मुलेही या आजाराने ग्रस्त आहेत.
गुजरात राज्यात सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या गुजरात डॉक्टर असोसिएशन यांच्या गुजरात आयकॉन २०२४ संमेलनात सदर बाबींचा आढावा घेण्यात आला असुन असे आजार झाल्यास त्यावर उपचार आणि आजार होऊच नये यासाठी करावयाचे उपाय योजना याबद्दल सखोल चर्चा झाली. यांत कोपरगांव येथील आयुर्वेद तज्ञ डॉ तुषार गलांडे यांनी सहभाग नोंदवुन मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी २५० नामांकित डॉक्टर उपस्थित होते.
आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाला आणि आहारास खुप महत्व असुन त्याच्या अभावी असे आजार होतात. सकाळी उठून भरभर पायी चालणे, सायकल चालविणे, पळणे असे व्यायाम मलबध्दता कमी करणेसाठी फायदेशिर ठरतात. आहारामध्ये बाजरी, मैदा, हरभरा डाळ, जास्त तिखट यांचा समावेश टाळावा. सकाळी दुध, कोमट पाणी, गावरान तुप, वेगवेगळी फळे, कच्च्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा.
मुळव्याध, भगंदर व फिशर या आजारांसाठी प्रथम अवस्थेत औषधांचा चांगला उपयोग होतो व पुढील अवस्थेत क्षारसुत्र पध्दतीचा उपयोग केल्याने आजार कायम स्वरूपी बरा होतो. ऑपरेशन करूनही अथवा मुळव्याधीचे इंजेक्शन घेवूनही परत परत उदभवणाऱ्या या आजारावर आयुर्वेदीय क्षारसुत्र पध्दत वरदान ठरली असुन जागतिक आरोग्य संघटनेने सदर उपचार पध्दतीस मान्यता दिली आहे. या पध्दतीमध्ये हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस अॅडमिट रहाण्याची गरज नसते. शौचाचे नियंत्रण जाण्याचा धोका नसतो. वेदना कमी प्रमाणात असतात व रूग्ण आपले दैनंदिन कामकाज लवकरात लवकर सुरू करू शकतो.