आणखी एकाने पावणेतीन कोटी रुपयांना लावला चुना

शेवगावात शेअर ट्रेडींगच्या गुन्हयाचा सिलसिल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्यातील कुरुडगाव येथील आणखी  एकाच्या विरोधात तब्बल २ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या युवकाने शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली प्रती महिना १२ टक्के प्रमाणे परतावा देतो, असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

 काल गुरुवारी (दि.२५)  रात्री उशिरा शेवगाव पोलीस ठाण्यात सोपान माधव काळे ( वय ३८, वर्ष धंदा- शेती, रा. कुरुडगाव ता. शेवगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शंकर रावसाहेब शिंदे ( रा. कुरुडगाव ) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

फिर्यादी मध्ये म्हटले की, शिंदे याने एसआर इन्वेस्टर या नावाने, गावात शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरु केले होते. काळे तेथे गेले असता त्यांना प्रती महिना १२ टक्के प्रमाणे परतावा देत असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेऊन काळे यांनी वेळोवेळी आर.टी.जी.एस, फोन पे तसेच रोख स्वरुपात असे एकूण ६९ लाख ४० हजार रुपये शिंदे यास दिले. त्या बदल्यात शिंदे याने त्यांना पावती दिली.  परतावा मागण्यासाठी काळे गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. दरम्यान शिंदे हा कार्यालय, घराला कुलूप लावून पळून गेल्याचे कळाले. यावेळी फसवणूक झाल्याचे काळे यांच्या लक्षात आले.

   गावातील तसेच परिसरातील कैलास सुभाष राऊत ६० लाख रुपये, ताजुभाई कडुभाई शेख १ लाख ४० हजार, दत्तात्रय त्रिंबक औटी ११ लाख ५० हजार, सचिन राजू शिंदे ५ लाख, बबन अण्णासाहेब शिरसाट २८ लाख ५० हजार, जालिंदर रावसाहेब जाधव ३ लाख, अवधूत विनायक केदार २ लाख ५० हजार, संजय नारायण कोकासे ४ लाख ५० हजार, महेश दानियल घाडगे ७० हजार, उषाबाई तुकाराम खरात २ लाख, कृष्णा रावसाहेब घनवट ३ लाख, नितीन बाळू तिजोरे २ लाख ४० हजार, विनोद दिनकर घाडगे ५ लाख, अशोक केशव कापरे १० लाख असे सर्वांचे २ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.