लाडकी बहिण योजनेचे अर्ज ऑनलाईन करण्यास गती वाढवावी – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले जात आहे. रोज नव्याने येणाऱ्या अर्जांची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी सर्व्हर चालत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी दिवसाकाठी केवळ दहा ते बारा अर्ज अपलोड होत आहेत. संख्या अधिक असल्याने येत्या काळात ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियेची गती वाढविण्याची आवश्यकता असल्याची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शासनाकडून महिलांना मिळणाऱ्या पैशातून अनेक कुटुंबाला आर्थिक हातभार या निमित्ताने मिळणार आहे. कुटुंब चालवताना मोठी कसरत करावी लागते त्यात हे पैसे अशा महत्वाच्या वेळी मिळाले तर अधिक चांगले होईल. महिला भगिनींना येणाऱ्या अडचणी सोडवणूक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आवश्यक कागदपत्रे असताना महिलांना ऑनलाईन पोर्टल आणि अर्ज नोंद करण्यासाठी विलंब झाल्याने ओटीपी मिळत नाही. अनेकदा तासनतास प्रयत्न करूनही अर्ज ऑनलाईन भरले जात नाही त्यामुळे तांत्रिक अडचण दूर करून उर्वरित वेळेत अधिकाधिक महिला भगिनींना लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रिया गतिमान व्हावी अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागळात पोहचविण्यासाठी प्रशासनाची साथ गरजेची आहे. जर वेगवान पद्धतीने गती मिळाली तर अनेक महिलांना नोंदणी करने शक्य होईल.सर्वच स्तरावर यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र अधिक जलद पद्धतीने कसे सर्वच अर्ज ऑनलाईन स्वीकृत होतील यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील भावा बहिणीनी सहकार्य करावे अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मध्यंतरी साधारण सात ते आठ दिवस संकेतस्थळ बंद होते, त्यामुळे अनेकांना ओटिपी प्राप्त होण्यास विलंब झाला. या तांत्रिक अडचणींचा महिलांमध्ये आपल्याला ओटीपी का प्राप्त होत नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र ती अडचण दूर होऊन आता सुरळीत अर्ज भरणे सुरू राहिल्यास अधिक भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.