शरद पवारांनी विवेक कोल्हेंना हेरलं, नगर जिल्ह्यात शरद पवारांची नवी खेळी?

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना हेरलं आणि शरद पवार यांनी पुण्यातील बैठकी नंतर विवेक कोल्हे यांना आवर्जून बोलवून आपल्या गाडीत शेजारी बसवून पुढचा प्रवास केला.

विवेक कोल्हे शरद पवार यांच्या गाडीत बसल्याचे प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांन आपल्या कॅमेऱ्यात टिपताच सोशल मीडियावर कोल्हे-पवार यांच्या बद्दल बातम्या झळकु लागल्या. शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना आपल्या गाडीत बसवून पुण्यात फिरले आणि राजकारणाचे चक्र कोपरगावसह राज्यात फिरू लागले. माजी मंञी स्व शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे शरद पवार यांच्या गाडीत बसुन गेल्याने कोपरगाव मतदार संघात कही खुशी कही गम सुरु झाले.

कोल्हे भाजपला रामराम ठोकुण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत यावे यासाठी काहींची इच्छा आहे. तर कोल्हे परिवार भाजपमध्येच राहावे अशीही काहींची इच्छा आहे. राज्यात सध्या तापलेले वातावरण आणि अचानक विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या गाडीत बसुन पुण्यात केलेला प्रवास संपुर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे ठरले आहे.

दरम्यान पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक मंगळवारी नुकतीच झाली ही संस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करीत असते. या संस्थेचे प्रमुख शरद पवार आहेत. या बैठकीला राज्यातील अनेक दिग्गज नियुक्त सदस्य हजर होते. त्यात विशेष चर्चा सुरु झाली, ती माजी मंञी हर्षवर्धन पाटील व विवेक कोल्हे यांची, कारण हर्षवर्धन पाटील व विवेक कोल्हे सध्या जरी भाजपचे असले तरीही दोघांचे कार्यकर्ते भाजपवर नाराज असल्याचे अनेकवेळा उघड झाले. विवेक कोल्हे यांनी नुकतीच नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणुक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली त्यात ते दुसऱ्या क्रमांकाचे मतं घेवून आपल्या कार्याची झलक राज्याला दाखवून दिली.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने महसुली राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता उलथून टाकल्याने विवेक कोल्हे राज्यातील लक्षवेधी नेते ठरले. अशातच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे सध्या महायुतीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात सामिल असल्याने भाजपमध्ये असलेले कोल्हे यांची कोंडी झाली आहे. महायुतीच्या ऐकिव फाॅर्म्युल्यानुसार विद्यमान आमदारांना महायुतीचा उमेदवार म्हणून तिकीट दिले जाणार असल्याचे बोलले जात असल्याने कोल्हे कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशातच शरद पवार व अजित पवार यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेल्याने राज्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. नुकतेच शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना आपल्या जवळ केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोल्हे यांना जवळ करुन शरद पवार नगर जिल्ह्याचे राजकारण बदलणार की काय? शरद पवारांच्या या नव्या खेळीने कोणाला बाद करणार आणि कोणाला साद घालणार याची उत्सुकता वाढली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार आशुतोष काळे यांना बळ देण्यासाठी वारंवार कोपरगाव दौरे करीत आहेत. अशातच शरद पवार यांनी काळे यांचे पारंपारिक राजकीय विरोधक विवेक कोल्हे यांना जवळ केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा होता. आज शरद पवार राजकीय अडचणीत असल्याने पवार पुन्हा एकदा शंकरराव कोल्हे यांचा छावा विवेक कोल्हे यांना हेरले असावेत अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.