कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : पाणी नियोजनात आलेले अपयश झाकण्यासाठी आमदार काळे यांनी घाई घाईने जलपूजन केले. चोवीस तास देखील उलटत नाही तोच पाण्याचा प्रवाह कमी केला आहे. याचा अर्थ फक्त पूजन करून फोटो काढण्यापुरते हे नाटक होते का? जनता तुमच्यासाठी थट्टा करण्याचा विषय आहे का? जे पाणी काल आले ते केवळ औपचारिकता ठरले. आज कोपरगाव तालुक्यातील गावांसाठी प्रवाह अत्यंत धिमा करून त्याउलट जास्त प्रमाणात पाणी थेट वैजापूरकडे जाते आहे व कोपरगाव तालुक्यातील गावांचे हक्काचे पाणी असताना आमदारांचा मात्र नौटंकीपणा चालला आहे अशी परखड भावना प्रगतिशील शेतकरी पिराजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पढेगाव, कासली, शिरसगाव, सावळगाव, तिळवनी, आपेगाव, उक्कडगाव, गोधेगाव या भागातील शेतकऱ्यांसाठी हक्काचे पाणी मिळावे यासाठी युवानेते विवेक कोल्हे यांनी सर्वप्रथम पालखेडचे ओव्हर फ्लोचे पाणी कोपरगाव तालुक्याला मिळून बंधारे भरावे अशी मागणी केली होती. मुळातच या गावांना पालखेड ओव्हर फ्लोचे पाणी मिळाले तरच बंधारे भरले जातात अन्यथा पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. दुगलगाव बंधारे भरले की, पाणी बंद होते हा अनेकदा आलेला कटू अनुभव आहे.
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी अनेक बंधारे पाझर तलाव बांधून घेतले व त्यासाठी स्वतः सहकार्य केले. आज अनेक गावातील शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास त्याची मदत होते. गत पंचवार्षिक मद्ये एवढी हेळसांड पाण्यासाठी सौ.स्नेहलता कोल्हे यांनी होऊ दिली नाही मात्र सध्या फक्त वेड्यात काढण्याचे काम सुरू असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.
आपल्याला पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता आले नाही यामुळे काळे यांनी काल जलपूजन करून प्रत्यक्षात काडीचा संबंध नसताना श्रेय घेणे लावले आहे. कारण आमच्यासाठी ते पाणी मिळणे ही हक्काची बाब आहे. पण आमदारांनी केवळ चार दोन कार्यकर्त्यांना खुश केल्याचे भासवून दिशाहीन कारभार हाकणे हा प्रकार आमच्या पूर्वभागाचे नुकसान करणारा आहे त्यामुळे आम्ही येत्या काळात तीव्र भूमिका पाणी न मिळाल्याने योग्य ठिकाणी मांडणार आहोत असेही शेवटी शिंदे म्हणाले. पाऊस सुरू असून ओव्हर फ्लोचे पाणी मिळत असताना प्रसिध्दी पोटी आमची समस्या न जाणून घेता केवळ जलपूजनाचे नाटक झाले प्रत्यक्षात मात्र सत्यस्थिती वेगळी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आमच्या भागातील पाण्याचा प्रश्न स्व.शंकरराव कोल्हे यांनी खऱ्या अर्थाने जाणला होता. त्याकाळी बंधारे, तलावांची निर्मिती झाली नसती तर आज अतिशय भीषण पाणी टंचाईला आम्हाला सामोरे जावे लागले असते. दुर्देवाने आमदार काळे यांनी आमच्या भावनांशी खेळून पाणी पुजण्याचे नाटक केले कारण ते पाणी आम्हाला पूर्ण क्षमतेने न मिळता इतर तालुक्यात रवाना झाले आहे. – रेवण निकम

