पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची कोपरगाव शहरात द्वितीय शाखा सुरु

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : ग्राहकांना उत्तम सेवा देवून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे कर्मचारी तसेच कारखाना परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करणाऱ्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प.पू. श्री रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणाऱ्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने नेहमीच पारदर्शक व्यवहार व ग्राहकांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शीपणा आणि काटकसर याची योग्य पद्धतीने सांगड घालत दिवसेंदिवस मोठी आर्थिक उलाढाल करणाऱ्या पतसंस्थेने पतसंस्था क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमट्विला आहे.

ग्राहकांना उत्तम सेवा देणारी पतसंस्था अशी या संस्थेची ओळख असून कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिक, छोटे मोठे व्यापारी यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था महत्वाची भूमिका बजावेल. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांचे स्वागत व प्रास्तविक चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी केले. तर आभार व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी मानले.याप्रसंगी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्था तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.