कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ पाण्यासाठी मराठवाडा विरुद्ध नगर- नाशिक हा वाद संपूर्ण राज्याला परिचित आहे. दरवर्षी आमच्या हक्काचे पाणी आम्ही घेणार यावरून कोर्ट-कचेरीसह अनेक आंदोलने करीत थेट मंञालयात आवाज उठवणाऱ्या नेत्यांची तोंड पावसाने बंद केले. मराठवाड्यातील नागरीकांना यावर्षी पाण्यावर वाद घालण्याची संधी मिळणार नाही अशी व्यवस्था वरुन राजाने केली आहे. आजून पावसाळा बाकी असतानाच मराठवाड्याचं जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणं शंभर टक्के भरल्याने वर्षभराचा पाण्याचा प्रश मिटला तरीही कोपरगावच्या नागरीकांना दररोज स्वच्छ पाणी मिळणार की, नाही याची चिंता गोदावरीच्या काठावर वसलेल्या कोपरगावकरांना लागली आहे. कोपरगावकरांना सध्या भर पावसाळ्यात आठदिवसाड पिण्याचे पाणी मिळत आहे.
जोपर्यंत जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरत नाही तो पर्यंत नगर-नाशिक जिल्ह्यातील नागरीकांची धाकधूक सुरु असते. कारण समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडी धरण जो पर्यंत ६४ टक्के भरत नाही तो पर्यंत नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील नागरीकांचा हक्क सांगितला जातोय. या काळ्या कायद्यामुळे नगर-नाशिककरांच्या हक्काचे पाणी डोळ्यांदेखत जायकवाडी धरणात सोडण्याची वेळ येते. पण आता निसर्गाने चमत्कार करीत जायकवाडी शंभर टक्के भरल्याने नगर नाशिकच्या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्यांना समाधान झाले आहे.
एकदा जायकवाडी धरण शंभर टक्के भरले तर मराठवाड्यातील नागरीकांचा पुढील चार वर्ष पिण्याच्या पाण्याचा तर दोन वर्षे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे नगर-नाशिकच्या धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चालु वर्षी दमदार पाऊस पडल्याने नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली आहेत. सर्वदुर पाऊस दमदार झाल्याने सध्यातरी पाण्याची मागणी कमी झाली आहे.
विशेषतः मराठवाड्यात आजूनही जोरदार पाऊस सुरु असल्याने जायकवाडी धरणा बरोबर माजलगावचे धरण सुध्दा काठोकाठ भरत आले आहे. मराठवाड्यातील कोरडी असलेली छोटीमोठी धरणे बऱ्यापैकी जलमय झाल्याने चालु वर्षी कुठेही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या गोदावरी खोऱ्यातील बहुतांश धरणं शंभर टक्के भरली आहेत. जायकवाडी धरणात एकट्या गोदावरी खोऱ्यातून निम्मे पाणी पोहचले आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी गोदावरी नदीतून तब्बल ४२.५७२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. पैकी एकट्या दारणा धरणातून १६ टीएमसी पाणी जायकवाडीत धरणासाठी सोडण्यात आले. गंगापूर, भाम, भावली, गौतमी, कश्यपी, वालदेवी, पालखेड आळंदी, भोजापूर, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव आदी धरणातुन पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले.
एकट्या गोदावरी खोऱ्यातील पाण्यामुळे निम्मे जायकवाडी धरण भरले आहे. चालु वर्षी तरी वर्षभर पिण्याचा व सिंचनाचा पाणी प्रश्न मिटल्या ने पाण्यावरून राजकारण करणाऱ्यांची तोंडं पावसानेच बंद केल्याने पाण्यावरचा तात्पुरता वाद क्षमला आहे. शंभर टक्के भरलेल्या धरणातील पाण्याचे योग्य नियोजन पाटबंधारे विभागाने केले तर पाणी मी टंचाई उद्भवणारच नाही. जायकवाडी भरल्याने सर्वांना आनंद झाला आहे.