स्मार्ट सिटी बाहेर कुणी नेली, उतारे दाखवायची वेळ येवू देवू नका – गोरक्षनाथ जामदार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : विधानसभा निवडणुका आल्यामुळे चुकीचे आरोप करून तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे, हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे आरोप करतांना जरा जपूनच करा. स्मार्ट सिटी कुणी तालुक्याच्या बाहेर आणि कशासाठी नेली यासाठी जमिनीचे उतारे दाखवायची वेळ येवू देवू नका असा ईशारा कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला आहे.

आ. आशुतोष काळे यांच्यावर विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतांना जामदार यांनी पुढे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी ३००० कोटी पेक्षा जास्त निधी आणला आहे आणि या निधीतून झालेली कामे व प्रगतीपथावर असलेली कामे जनतेला दिसत आहे. मात्र ज्यांच्याकडे विकासाची दृष्टीच नाही त्यांना हा विकास कधीच दिसणार नाही. आजपर्यंत त्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता असतांना त्या चाळीस वर्षात जेवढा निधी आला त्यापेक्षा कित्येक पटींनी आ.आशुतोष काळे यांनी या पाच वर्षात निधी आणला आहे.

ज्या कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आजवर ज्यांनी आपली दुकानदारी चालविली त्यांची ती दुकानदारी पाच नंबर साठवण तलावामुळे कायमची बंद पडली. त्यामुळे यापुढे राजकारण करायचे तरी कशावर असा प्रश्न ज्यांना पडला आहे त्यांना आ.आशुतोष काळे यांच्यावर टीका करून कुठेतरी चर्चेत राहायचे आहे. आ.आशुतोष काळे यांचा स्वभाव मतदार संघातील जनतेला माहित आहे व विरोधक कोणत्या प्रकारचे राजकारण करतात हे देखील माहित आहे.

त्यामुळे जनतेने ज्या अपेक्षेतून आपल्याला सेवा करण्याची संधी दिली त्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मागील अनेक दशकापासूनचे प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न सोडवून दाखविले आहे. हे विरोधकांना पचनी पडत नसल्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ सुरु असून चुकीचे आरोप करून गरळ ओकली जात आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना ज्यांना चाळीस वर्षात बेरोजगारी दिसली नाही ते आज बेरोजगारीवर गळे काढीत आहे. जे आज आपल्यात नाहीत त्यांच्यावर बोलणे उचित नाही. मात्र पाच वर्ष केंद्र व राज्यात सत्ता असतांना बेरोजगारी दिसली नाही का? असा प्रश्न आपल्या मातोश्रींना विचारला तर बरे होईल असा सल्ला देतांना तुम्ही वाढविलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जाहीरनाम्यात एम.आय.डी.सी. आणण्याची वचनपूर्ती करून कोपरगाव मतदार संघात एम.आय.डी.सी.आणली आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे. खालच्या पातळीचे राजकारण करण्याची आमच्या नेत्याची परंपरा नाही मात्र चुकीचे आरोप करून आपली राजकीय पोळी शेकली जाणार नाही हे लक्षात ठेवा असा सल्ला शेवटी गोरक्षनाथ जामदार यांनी विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला आहे.

आपल्या मातोश्री सत्तेचा वापर करून स्मार्ट सिटी कोपरगाव तालुक्याच्या बाहेर घेवून गेल्या. त्या ठिकाणी कुणाच्या जमिनी आहेत हे जमिनीच्या उताऱ्यावरून सिद्ध झाल्यास तुम्हाला तोंडघशी पडावे लागेल. त्यामुळे उगाचच चुकीचे आरोप करू नका. टीका करून मतदार संघात झालेला विकास झाकता येणार नाही. मात्र आपल्या कलेक्शन एजंटच्या नावावर असलेल्या स्मार्ट सिटीच्या जवळच्या जमिनीचे उतारे जर लोकांपर्यंत पोहोचले तर तोंडघशी पडाल. – गोरक्षनाथ जामदार.