शेतीच्या वादातील आरोपींना ३ वर्षाचा कारावास

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील शेतीचा बांध कोरल्याच्या कारणावरून तीन जणांना लोखंडी पाईपने केलेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले होते. यात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने यातील आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे, सोमनाथ सीताराम वलटे, मीना सोमनाथ वलटे आदी तीन जणांना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांच्या युक्तिवादानंतर त्यांना ०३ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे असामाजिक तत्वांना असे गंभीर गुन्हे करताना चारवेळा विचार करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून उमटली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी दत्तात्रय आबासाहेब वलटे आणि आरोपी सोमनाथ सीताराम वलटे हे चुलते पुतणे आहे. त्यांच्यात शेतीच्या बांधावरून वाद आहेत. दरम्यान फिर्यादी दात्तात्रय वलटे हे आपले वडील आबासाहेब वलटे, आई सिंधुताई वलटे आदी दि. ०९ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे, सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जण आले व फिर्यादी व त्याचे घरातील अन्य सदस्यांना म्हणू लागले की, “तुम्ही आमच्या शेतीचा बांध का कोरला ?” असा जाब करून आरोपी सोमनाथ वलटे यांनी आपल्या हातातील लाकडी दांडा फिर्यादीची आई सिंधूबाई वलटे हिच्या डोक्यात मारला होता.

व्यंकटेश वलटे याने आपल्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात प्रहार केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी मुलगा गेला असता त्यालाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात दोघं जण जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी मीना वलटे हिलाही पाईपने मारहाण केली होती. फिर्यादी आणि त्यांचे आई वडील गंभीर जखमी झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले होते. त्यानंतर जखमींना लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय वलटे याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं. ३२७/२०२० भा.द.वी. कलम ३२६, ३२५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ (१) प्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचेसंमोर सुनावणी साठी दाखल झाला होता. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पूर्ण झाली होती त्यात सरकारी वकील प्रदीप रणधीर यांनी फिर्यादीचे वतीने जोरदार बाजू मांडली.

न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्या. भगवान पंडित यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे, सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जणांना दोषी धरून 3 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे या निकालाचे कोपरगाव तालुक्यासह कारवाडी आणि परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. 

Leave a Reply