शेवगाव प्रतीनिधी, दि. ३ : शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृ्ष्टिकोन विकसीत होणे महत्वाचे आहे. शिक्षक व पालक यांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात येथील मुले – मुली नाव कमावतील. असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला. येथील शेवगाव इंग्लिश मे़डियम व ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित ४४ व्या गणित व विज्ञान तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन आ.राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, शैलजा राऊळ, प्राचार्य शशिकांत प्रधान, वर्षा दारकुंडे, विदूला पराजंपे यांचेसह केंद्रप्रमुख व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दूल कलाम यांच्यासह अनेक वैज्ञानिकांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानात मोठे योगदान दिले आहे. येथील विज्ञान – गणित प्रदर्शन मी बारकाईने पाहिले आहे. या विद्यार्थ्यांत प्रचंड गुणवत्ता आहे. पर्यावरण, स्मार्ट सिटी, सेंद्रिय शेती यासह अनेक विषयांवर त्यांनी प्रदर्शनात उपकरणे सादर केली आहेत. या बद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
डॉ. गाडेकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत होणे हे गणित – विज्ञान प्रदर्शनाचे उद्दीष्ट असल्याची तसेच तालुक्यातील ३११ शाळांतील विद्यार्थी व शिक्षक या प्रदर्शनात सहभागी झाले असल्याची माहिती दिली. मुकूंद आंचवले यांनी सूत्रसंचलन केले तर देवढे यांनी आभार मानले.