कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राप्ती दीपक बुधवंत हिने कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे स्मृति-प्रित्यर्थ एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव येथे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून संस्था व महाविद्यालयाची किर्तीपताका उंचावली असल्याचे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे केले.
रुपये ७०००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. कु. प्राप्ती बुधवंत ही अकरावी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी असून तिने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावून संस्था व महाविद्यालयाचे नाव मोठे केले असल्याचेही डॉ. ठाणगे म्हणाले. प्राप्ती बुधवंतला वादविवाद व वांग्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्राप्तीच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे आदींनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच तिला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.