शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : तालुक्यातील गोळेगावच्या पाझर तलावात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मासेमारी करणाऱ्या स्थानिक व्यावसायिक ग्रामस्थ महिलेस डावलून, बाहेरच्या व्यक्तीच्या संस्थेस ठेका देण्यात आला. या संदर्भात न्याय मागण्यासाठी संबंधित महिलेचे संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांचे उपस्थितित येथील पंचायत समितीच्या प्रांगणात उपोषणास बसले असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.
या संदर्भात ढवळे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोळेगावातील रहिवासी असलेल्या कुसुम अंकुश पवार या भूमिहीन मत्स्यव्यवसायिक या तलावावर आपल्या कुटुंबाची सन २००५ पासून गोळेगाव ग्रामपंचायतीला रीतसर परवाना शुल्क भरून उपजीविका करत आहेत. करोनाच्या काळात तर जुलै २०२० च्या शेवटच्या आठवड्यात मुलांना ऊस तोडीला पाठवून उचल घेऊन ग्रामांचायतीला एकूण चार लाख दहा हजार रुपये भरून ठेका घेतला होता. ग्राम पंचायतीने या पैकी ८२ हजार रुपये जिल्हा परिषदेचा सेसही वर्ग केला आहे.
सध्या न्यायालयीन आदेशाने हा तलाव जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार जलसंधारण अधिकारी उपविभाग नेवासा यांनी दूरच्या संस्थेस ठेका दिल्याने पवार कुटुंबीय बेसहारा होऊन रस्त्यावर आले. पुढील ठेका देताना स्थानिक मासेमारांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. असा दावा करून दिनांक २८ सप्टेबर २०२३ ला नवीन ठेका पंचक्रोषी बाहेरील वैष्णवी देवी मच्छीमार संस्थेला दिला, तो रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे.
यासंदर्भात -उपविभागाचे जलसंधारण अधिकारी जिपलपा उपविभाग नेवासा यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना येथील ठेक्या बाबत २१ ऑगष्ट व ४ सप्टेबर २३ ला कळविण्यात आले असल्याचे म्हटले आहे. ८ सप्टेबर २३ अखेर ग्रामपंचायतींनी माहिती कळविली नाही तर उपविभागाकडे आलेल्या अर्जावर एकतर्फी निर्णय घेऊन ठेका देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आल्याचे म्हटले असून यावेळी राजेंद्र पांडव यांचा एकमेव अर्ज आला. त्यानुसार त्यांना हा ठेका दिल्याचा खुलासा केल्याचे म्हटले आहे.
यावर ढवळे यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणाले, येथील ठेक्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना कळविले असल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी गोळेगाव ग्रामपंचायतीने असे पत्र मिळाले नसल्याचा खुलासा केला असून चार वर्षांपूर्वी येथील ठेका तब्बल चार लाख दहा हजार रुपयाला गेला तेव्हा त्यानंतर यंदाचा ठेका त्यापेक्षा किमान पाच दहा टक्के अधिक रकमेला जाणे आवश्यक होते. मात्र हा ठेका केवळ १९ हजाराला तोही पाच वर्षासाठी दिला गेलाय. तसेच यावेळी ठेका घेण्यासाठी एकच मागणी आल्याने तो रहित करून पुनश्च पुढील तारीख देऊन त्याचा फेर विचार करणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही. एकूणच हा सर्व व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात असल्याने याबाबत फेरविचार करणे आवश्यक असल्याचे ढवळे यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भ।त ७ मे २०२३ च्या शासन परिपत्रका नुसार मत्स्य व्यवसायाचा ठेका देणेबाबत मार्गदर्शक सुचना करण्यात आल्याचा हवाला देण्यात आला आहे त्यातील क्र. दोनला मत्स्यव्यवसायाचा ठेका देताना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना कटाक्षाने आग्रक्रम देण्यात यावा असे म्हटले असल्याने हा ठेका संस्थेला देण्यात आल्याचा खुलासा संबंधित विभाग करत असला तरी याच परिपत्रकात क्रमांक एकलाच मत्स्य व्यवसायाचा ठेका देण्याची कार्यवाही तालुकास्तरावर संबंधित ग्रामपंचायतच्या सहाय्याने जिल्हा परिषद उपविभाग यांनी करावी. असे म्हटले आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा ठेका देण्यापूर्वी पंचायत समिती व गोळेगाव ग्रामपंचायतीस सुद्धा कळविण्यात आले नव्हते ही वस्तुस्थिती आहे.
तलाव ठेक्याची रक्कम ठरवितांना खालील सूत्रानुसार आकारण्यात यावी –
तलाव ठेका रक्कम रुपये = तलावाचे क्षेत्र (हेक्टर ) x अपेक्षित मत्स्य उत्पादन प्रती हेक्टर ( किलो) x प्रति किलो मासळीचा बाजारभाव (रु.२५ ) x ३ / १००
दिनांक १४ ऑगस्ट २०२३ ते २५ नोव्हेंबर २३ या काळात गोळेगाव ग्रामपंचायतीवर प्रशासक होते. यासंदर्भात ग्रामपंचायतीला कोणतीही लेखी सूचना आलेली नसून विश्वासातही घेण्यात आलेले नाही. – मुक्ता आंधळे, सरपंच गोळेगाव ग्रामपंचायत