कोपरगाव प्रतीनिधी, दि. १७ : नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ होय. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

या कायद्यामुळे नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळविण्यासोबतच, शासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी तालुकास्तरीय आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व तालुकास्तरीय विभागप्रमुखांना केल्या.

दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक विभागाच्या मा. राज्य सेवा हक्क आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी ह्या कोपरगाव तालुका दौऱ्यावर आलेल्या होत्या. त्याप्रसंगी आयुक्त यांनी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

आयुक्त यांनी कोपरगाव नगरपरिषदेत विविध सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सेवानिहाय आढावा घेतला. तसेच नगरपरिषदेतील आपले सरकार कक्ष तसेच विविध विभागांना भेटी दिल्या. त्यानंतर तालुकास्तरीय सर्व विभागप्रमुखांची बैठक पंचायत समिती कार्यालयात घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये आयुक्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकामी सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या व तत्परतेने घेता यावा, यासाठी विभागांतर्गत येणाऱ्या अधिकतम सेवा अधिसूचित करण्यासोबतच कायद्याच्या जनजागृतीसाठी विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कायद्यांतर्गत आयोगाचे अधिकार, शासकीय लोकसेवकाची कर्तव्य व दायित्व, सामान्य जनतेला लाभदायी ठरण्यासाठी अधिसूचीत सेवांत सुधारणा, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नैतिक जबाबदाऱ्या, कायद्याचे काटेकोर पालन याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रंसगी अधिकाऱ्यांव्दारे विचारण्यात आलेल्या प्रश्न व शंकांचे निरसन आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लीता सातपुते, सहायक गट विकास अधिकारी संदीप दळवी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, सामाजिक वनीकरणचे निलेश रोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रतिभा खेमनर तसेच जलसंधारण, महावितरण, पशुसंवर्धन, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागव पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.
