शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : गेल्या वर्षाच्या प्रारंभी भारतीय जनता पार्टीच्या झालेल्या पदाधिकारी निवडी संदर्भात वादंग झाले होते. त्यानंतर लगेच निवडणुका लागल्याने ते सुप्त झाले मात्र अखेर त्याचे पर्यवसान आज शेवगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष तुषार वैद्य यांच्या राजीनाम्यात झाले आहे. वैद्य यांनी शनिवार दि. १८ रोजी आपल्या गावी, बालमटाकळीला पत्रकार परिषद घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे आपला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली.
वैद्य यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, आपण भाजपा अध्यक्ष या पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर पक्ष वाढीसाठी आपल्यापरीने प्रयत्न केले. लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही.
कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. त्यावेळी त्यांना अगणित सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
त्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. नंतर मला पक्षाने २००९ ला युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व नंतर २०१० ते २०१६ पर्यंत दोन वेळा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले.
२०१४ व २०१९ आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सख्य राहीले नाही. प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. शेवगाव तालुक्यात पक्ष वाढीसाठी व निष्ठेसाठी अनेकांचे योगदान आहेच.
परंतु वैद्य परिवाराचा त्यात सिंहाचा वाटा आहे. हे मी अभीमानाने नमुद करतो. मी पदावर असून देखील या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत असून यापुढे आपण पक्षाच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून राहणे पसंत करू असेही शेवटी नमुद केले आहे.