सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गोदावरी दूध संघातील विविध प्रकल्पांचा शुभारंभ
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : दूध उत्पादन प्रकल्पामध्ये जितकी आधुनिकता येते तितक्या पळवाटा काढून दूधात भेसळ करतात. दूधात भेसळ करणं म्हणजे पाप समजलं पाहीजे एक बातमी भेसळीची आली तरी दूध विक्रीवर मोठा परिणाम होतो. तेव्हा दूध उत्पादकापासुन दूध विक्रेत्या पर्यंत सर्वांनी खबरदारी घेतली पाहीजे असे मत राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी सकाळी गोदावरी दूध संघाच्या नव्या दिड मेघावॅट उर्जा प्रकल्प, मिल्क क्लेरिफायर मशिन , कन्ट्यूअस खवा मेकींग मशिन, जलशुद्धीकरण प्रकल्प व नव्या जलकुंभासह विविध प्रकल्पांचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार रमेश बोरणारे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे संत रमेशगिरी महाराज, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, राजेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कृष्णा परजणे, विवेक परजणे आदीं उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दूध संघाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना बागडे पुढे म्हणाले की, सहकारी दूध संघ टिकवले पाहीजेत. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवून सहकारी संघ वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. सहकारी दूध संघाचा खरा मालक दूध उत्पादक शेतकरी सभासद आहे व्यक्तीगत कोणी मालक नाही. सहकारात लुटमार केल्याने सहकार अडचणीत येतो. पश्चिम महाराष्ट्रात दूधावरची साय खाल्ली जाते, तर विदर्भ मराठवाड्यातील लोक दूधाला साय येवू देत नाहीत दूधच पिऊन टाकतात असा एक दाखला देत बागडे यांनी सहकारी क्षेञात काम करणाऱ्यांचे लक्ष वेधले.

गोदावरी दूध संघाची प्रगती इतरांना आदर्शवत आहे. दूध व्यवसायात मोठे भांडवलदार, मोठ शेतकरी कधीच उतरत नाहीत. कारण दूध व्यवसायात परवडणारा नाही. हा व्यवसाय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. दूधात भारत अव्वल आहे पण दूधाचा खप कमी आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वात कमी खप आहे. येथे फक्त चहा पिण्यासाठी दूध वापरतात पंजाब व हरियाणा सह इतर राज्यात व्यक्तीगत दूधाचा खप आहे. राज्यात दूधाचा खप वाढला पाहीजेत. सहकारी संघापेक्षा राज्यात खाजगी संघ वाढले असे असले तरीही गोदावरी सहकारी संघाने ५० वर्षांचा पल्ला गाठल्याने राज्याला नवा आदर्श घालुन दिला आहे असेही बागडे शेवटी म्हणाले.

यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी दूध धंद्यातील काळाचे पावलं ओळखून पावलं टाकत आहेत. गोदावरी संघात प्रत्येकवेळी नववे बदल पहावयास मिळतात. एखादी सहकारी संस्था ५० वर्षांपर्यंत मजल मारते म्हणजे सहकारातील अधिकचा विश्वास राज्यामध्ये निर्माण केला आहे. भविष्यात दूध व्यवसायात अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते. बाजारातील शाॅर्टेड सिमेन्समुळे राज्यात नवे आव्हान निर्माण होवू शकते. या सिमेन्स मुळे गायांना कालवडी होत आहेत. हजारो कालवडीमुळे दूधाचे उत्पादन झपाट्याने वाढणार आहे. वाढलेल्या दूधाचे संकलन कसे करायचे त्या दूधावर कशी प्रक्रिया करावी याचे नियोजन करावे लागणार आहे. वाढत्या दूधावर प्रक्रिया करण्यासाठी शिर्डी व कोपरगाव येथे मदर डेअरीच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीत नवे प्रकल्प उभारणार आहे.

अहिल्यानगर एकट्या जिल्ह्यात दररोज तब्बल ५३ लाख लिटर दूध संकलन होते. वाढत्या दुधावर प्रक्रिया करण्याबरोबर संकलन करण्याची जबाबदारी मदर डेअरी वर दिली आहे. असे म्हणत भविष्यातील दूध व्यवसायाचे संकट कसे असणार याची जाणीव मंञी विखे पाटील यांनी करुन देत गोदावरी दूध संघाच्या कार्याचे खास शैलीत कौतू केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चेअरमन राजेश परजणे म्हणाले की, राज्य सरकारने दूधाला ७ रु. अनुदान सुरू केले होते ते अनुदान लाडक्या बहीणी प्रमाणे सुरु ठेवावेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने अनुदान चालु ठेवावे. मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मञीपद घेतल्याने पाटपाण्याचा प्रयत्न सोडवण्याची विनंती करुन गोदावरी दूध संघाच्या यशस्वी वाटचालीची रुपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे सुञसंचलन राजश्री पिंगळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विवेक परजणे यांनी व्यक्त केले.
