शेवगावात श्री रेणुका मल्टीस्टेटच्या हळदीकुंकू सोहळ्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ :  राज्यातील आर्थिक क्षेत्रात  माईल स्टोन  ठरलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट संस्थेच्या  १४०  शाखाद्वारे  विविध उपक्रम राबवून सातत्याने  जनसंपर्क वाढविण्यात येत असतो. संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ  अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांच्या संकल्पनेतून  कृषी दिन, डॉक्टर्स डे, शिक्षक दिन, जागतिक महिला दिन, इंजिनिअरीग, पत्रकार  दिन व ज्येष्ठ नागरिक दिन असे एक ना अनेक उपक्रम संस्थेत राबविले जातात. अशा उपक्रमाचे औचित्य साधून  सर्व संबंधिताना पाचारण करून त्यांना सन्मानित करण्याची संस्थेची प्रथा आहे.

देशातील नऊ राज्यातील  तब्बल  १४० शाखांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अशा सोहळ्यामुळे लाखो व्यक्ती संस्थेच्या शाखांत येतात. त्यांचा सन्मान तर केला जातो शिवाय या निमित्ताने त्यांना संस्थेच्या प्रगतीपर कामकाजाची माहितीही अनायासे होत असते. त्यातून अनेक जण संस्थेसी कायमचे जोडले जातात.

सध्या मकर संक्रांति निमित्त होत असलेला हळदीकुंकू समारंभ देखील संस्थेच्या या सर्व  शाखातून मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. गुरुवारी (दि.२३ )  संस्थेची प्रथम शाखा असलेल्या  शेवगाव शाखेत उत्साहात हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.

संस्थेचे रोज दिवसाकाठी होणारे आर्थिक व्यवहार यथोचित पार पाडत असताना  या समारंभा अगोदर तीन दिवस शेवगाव शाखेत लग्न घरासारखी धांदल सुरु होती. शाखेतील विविध प्रकारच्या ९ हजार खातेदारा व्यतिरिक्त अनेक मान्यवर व एकल  महिलांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आले. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ ते ७ वाजे पर्यंत तब्बल सात तास हा सोहळा उत्साहात सुरू होता. खातेदारासह विविध स्तरातील किमान साडे सातशे पेक्षा अधिक महिलांनी शाखेला भेट देऊन हळदीकुंकू  घेऊन वाण लुटले. शिवाय जातांना श्री रेणुका मल्टी स्टेट या संस्थेच्या विविध सोयी सवलतींची माहितीही घेतली.

शाखेच्या वरिष्ठ अधिकारी मीना गाढे, माधवी कसबे, स्मृति भाडाईत यांनी सर्वांना हळदी कुंकु देऊन वाण वाटप केले. संस्थेचे सवव्यवस्थापक राजेंद्र नांगरे यांचे मार्गदर्शनाखाली गणेश सुरूसे, ज्ञानेश्वर झिरपे, अविनाश देशमुख, राजेद्र सराफ यांनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply