कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार नाशिक पाटबंधारे विभागाकडून गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम सन २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील बारमाही उभी पिके, चारा पिके, ऊस तसेच फळबागा पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी देण्याचे जाहीर करण्यात येवून त्यासाठी गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकर्यांना ५ मार्च २०२५ पर्यंत आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणे बंधनकारक होते.

परंतु काही अडचणींमुळे बहुतांश शेतकरी ७ नंबर पाणी मागणी अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत भरू शकले नव्हते. गोदावरी कालव्याचा एकही लाभधारक शेतकरी पाण्यावाचून वंचित राहू नये व शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ७ नंबर अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशा सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या.

त्या सूचनेस अनुसरून पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्याकडून ७ नंबर पाणी मागणी अर्जासाठी नव्याने जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. गोदावरी कालव्याच्या अंतर्गत लाभधारक शेतकर्यांना उन्हाळी हंगामासाठी दि.१२ मार्च सायंकाळी ६.१५ पर्यंत ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

याची दखल घेवून गोदावरी कालव्याच्या ज्या लाभधारक शेतकर्यांनी अद्याप ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले नाहीत अशा शेतकर्यांनी आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज दि.१२ मार्च सायंकाळी ६.१५ वा.पर्यंत जलसंपदा विभागाच्या सबंधित कार्यालयाकडे दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
