नागरी सुविधा पुरवण्यासाठी सुध्दा पैसे नसल्याने अधिकारी चिंताग्रस्त
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव नगरपालीकेच्या इतिहासात प्रथमच पालीकेच्या तिजोरीत पुर्ण खडखडाट झाला असुन कोपरगाव पालीकेकडे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी सुध्दा पैसे नसल्याने शहरातील नागरीकांना नागरी सुविधा कशा पुरवायच्या या चिंतेने पालीकेचे अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत. जर शासनाकडून पैसे मिळत नसतील तर आम्ही काय करायचे अशी खंत खुद्द पालीकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी बोलताना व्यक्त केली.

मुख्याधिकारी सुहास जगताप पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून १५ वा वित्त आयोगाचे पैसे पालीकेला मिळाले नाहीत त्यामुळे शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचा गेल्या तिन वर्षापुर्वी झालेल्या करारावर काम करु घ्यावे लागत आहे. नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासाठी वाढीव निधी नाही, अशातच आहे त्या ठेकेदाला केलेल्या कामाचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत.

पालीकेच्या अनेक विकास कामांना लगाम बसला आहे तसेच पुर्वी झालेल्या विकास कामांचे थकीत बिले देणे बाकी आहे. शासनाने सध्या पैसे देण्यास नकार दिला असुन जो पर्यंत पालीकेची निवडणूक होवून सदस्य नियुक्त होत नाहीत तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत असा आदेश असल्याचे मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले आहेत.

दरम्यान कोपरगाव पालीकेच्या डोक्यावर जूने कर्ज १४ कोटी १ लाख रुपये असुन विविध योजनांसाठी ते घेतलेले होते. अशातच पालीकेच्या तिजोरीत केवळ २ ते ३ लाख रूपये नफा फंडातले शिल्लक आहेत. नफा फंडातून दर महिन्याला पालीकेला पथदिव्याचे लाईट बिल ६ लाख रुपये, जलशुद्धीकरणाचे लाईट बिल ६ लाख रुपये भरावे लागतात. जलशुध्दीकर व इतर लिकेज् कामासाठी ५ लाख , शहरातील घनकचरा संकलन व व्यवस्था यासाठी ३० लाख व इतर असा सरासरी ५० लाख रूपये देणे आहे. जवळ शिल्लक २ ते ३ लाख आणि खर्च ५० लाख इतकी तफावत आहे.

या व्यतिरिक्त पालीकेला पाटबंधारे विभागाची थकीत देणेदारी ६ कोटी आहे. थकीत लाईट बिल २५ लाख रुपये घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांचे देणे ६० लाख तर ५० लाख रूपये नफा फंडातून विकास कामे केलेल्या ठेकेदारांचे बिले देणे बाकी आहे. सर्व मिळून आज मितीला पालीकेला देणेदारी २१ कोटी ३६ लाख रूपये आहे आणि जवळ फक्त ३ लाख असल्याने कोपरगाव पालिकेचे अधिकारी पैशा अभावी काय करणार या चिंतेत बसले आहेत. तिजोरीत पैसे नाहीत आणि थकीत बिले वसुलीसाठी ठेकेदार व इतर सेवा पुरवणारे दररोज चकरा मारत असल्याने लेखापाल प्रदिप गाडगे यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीत सध्या १९ हजार ७६८ मालमत्ताधार आहेत. गेल्या अर्थीक वर्षात १८ हजार ६२८ मालमत्ता धारकांची एकुण घरपट्टी व पाणीपट्टी मिळून ९ कोटी ९१ लाख रुपये मागणी होती पैकी केवळ ५९ टक्के नागरीकांनी करा पोटी ५ कोटी ९३ लाख रुपये जमा केले. चालु वर्षी फक्त १५ टक्के नागरीकांनी कर भरल्याने पालीकेची शासनाकडून व नागरीकाकडून अर्थीक कोंडी झाली आहे.

शासनाने १५ वा वित्त आयोगाचे पैसे दोन वर्षांपासून दिले नाहीत आर्थिक वर्षे सन २०२३- २४ मध्ये दुसरा, सन २०२४-२५ मधील दोन्ही व सन २०२५ -२६ मधील पहीला हप्ता आजूनही दिला नसल्याचे सरासरी ३ कोटी रुपये शासनाने दिले तरी कोपरगाव पालीकेच्या कारभाराला व विकासाला गती मिळू शकते अन्यथा येत्या काही दिवसांत पालीकेला पैशा अभावी नागरी सुविधा बंद ठेवण्याची वेळ येवू शकते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव पालीकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने पालीकेचे अधिकारी चिंतेत आहेत. आता किमान नागरीकांनी तरी घरपट्टी पाणी पट्टी वेळेवर भरुन आपल्या शहराच्या विकासाला हातभार लावणे काळाची गरज आहे.
