कोपरगाव पालीका आरक्षण सोडतीतून अनेक दिग्गजांचा पत्ता कट 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : गेल्या चार वर्षांपासून कार्यकाळ संपूनही  कोपरगाव नगरपालीकेची सार्वत्रिक निवडणुक न झाल्याने व मागच्या सन २०१६ च्या निवडणुकीत संधी न मिळालेल्यांनी पुढीच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवकाचे स्वप्न रंगवणाऱ्यांना आरक्षणाचा चांगलाच फटका बसला आहे. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले त्यात नागरीकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने सर्वसाधारण व इतर प्रवर्गातील इच्छुकांची संधी हुकली.  किमान नगरसेवक होवुन पालीकेच्या राजकीय आखाड्यात आपला दबदबा निर्माण करणाऱ्यांची संधी असताना  प्रभाग आरक्षणाच्या माध्यमातूनही तीही संधी हुकल्याने अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत उपनगराध्यक्ष असेलेले विजय वाजे, योगेश बागुल अनेक वर्षे पालीकेच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे  माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक व नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धे असलेले आमदार आशुतोष काळे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मंदार पहाडे या प्रमुख शिलेदारांची संधी आरक्षणामुळे हुकली आहे. तसेच पुर्वी नगरसेवक असलेले भारती वायखिंडे, सुवर्णा सोनवणे व सईदाबी शेख यांचा प्रभाग आरक्षणामुळे पत्ता कट झाला आहे.

आरक्षणाच्या बदलामुळे मागच्यावेळी पत्नी नगरसेविका होती तिथे पत्नी ऐवजी पतीला संधी मिळणार, त्यात माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,  राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक अतुल काले यांना निवडणुक लढवण्याची पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे. मागच्या निवडणुकीत नगरसेवक झालेल्यांपैकी संजय पवार, स्व. ताराबाई जपे, जनार्दन कदम, दीपा गिरमे, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, आरिफ  कुरेशी, संदीप पगारे, वीरेन बोरावके, हर्षा कांबळे, स्व. स्वप्निल निखाडे, वर्षा कहार, अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद, शिवाजी खांडेकर व अनिल आव्हाड यांच्या प्रभागात आरक्षणामुळे फार काही बदल न झाल्याने यांना पुन्हा निवडणुकीची संधी मिळू शकते. 

बुधवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या पालीका प्रभाग आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक दोन, तीन, पाच, आठ, अकरा व तेरामध्ये कोणताही बदल झाला नाही. प्रभाग ४ मध्ये सर्वसाधारण महीला ऐवजी सर्वसाधारण म्हणून खुला झाल्याने पत्नी ऐवजी पतीला संधी आहे.  प्रभागा ५  मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महीला आरक्षण पडल्याने विजय वाजे व सुवर्णा सोनवणे यांचा पत्ता कट झाला आहे.  प्रभाग  ६ मध्ये माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई यांच्या प्रभभागात सर्वसाधारण महीला ऐवजी सर्वसाधारण आरक्षण झाल्याने त्यांचे पती व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना संधी तर योगेश बागुल यांच्या जागी नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला आरक्षण पडल्याने बागुल यांची संधी गेली आहे. 

 प्रभाग ७ मध्ये सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महीला आरक्षण झाल्याने त्या भागाचे नगरसेवक मंदार पहाडे यांचा पत्ता कट झाला आहे. मंदार पहाडे नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या शर्यतीतून केवळ आरक्षणामुळे कट झाल्याने आमदार आशुतोष  काळे यांच्या गटाला  हा मोठा धक्का बसला आहे.  प्रभाग १४ मध्ये सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महीला आरक्षण पडल्याने माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक यांना नगपालीकेत पुन्हा निवडून जाण्याची संधी हुकली आहे.‌ त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांना मोठा धक्का बसला आहे. याच प्रभागात  नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला ऐवजी नागरीकांचा मागास प्रवर्ग झाल्याने पत्नी विद्या सोनवणे ऐवजी पती माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

 प्रभाग क्रमांक १५ मध्ये अनुसूचित जमाती ऐवजी अनुसूचित जातीचे महीला आरक्षण पडल्यामुळे भाजपच्या भारती वायखिंडे यांचा पत्ता कट झाला आहे. येथे  अनिल आव्हाड हे सुरक्षित राहीले आहेत. तर प्रभाग क्रमांक १ हा नव्याने निर्माण झाल्यामुळे तिथे सर्वसाधारण महीला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले असून इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. अनेवर्षे नगरसेवक होण्याचे स्वप्न रंगवून कार्यकर्ते पोसणाऱ्यांची या आरक्षणामुळे कोंडी झाली आहे. इतके वर्षे घेतलेली मेहनत व खर्च केलेला पैसा निकामी झाला. 

 पुर्वीच्या कोपरगाव  नगरपालीका हद्दीत १४ प्रभागात होते, आता नव्याने एक प्रभाग वाढल्याने १५ प्रभाग झाले असुन एका प्रभागात दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. पुर्वी २८ नगरसेवक होते आता ३० नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत असुन अपक्षासह अनेकांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याने ही निवडणुक मोठी रंगत आणणारी असेल. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची सध्या तरी वरिष्ठ पातळीवर महायुती असल्याने ते एका मंच्यावर एक दिसत असले तरी स्थानिक पातळीवर त्यांची महायुती कायम राहील याची शाश्वती निश्चित नाही.

अशातच महाविकास आघाडीच्यावतीने उभाठा सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे व काॅंग्रेससह भाजप व इतर पक्षातील  नाराज गटानी एकञ येवून पालीका निवडणुकीचा वेगळा आखाडा तयार केला तर तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीही झाले तरी आरक्षणाच्या बदलामुळे काळे, कोल्हे नव्या चेहऱ्यांना संधी देणार कि जुने चेहरे नव्या निवडणुकीत उतरवून नव्या जुन्यांचा मेळ साधणार हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.  या नव्या प्रभाग रचनेने अनेकांच्या अडचणी वाढल्या तर काहींच्या अडचणी  दूर झाल्या. काहीही झालं तरीही बड्या नेत्याची कृपा झाली तरच नगरसेवकाच्या निवडणुकीत उतरता येणार आहे. अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी करावी लागणार हे नक्की.

Leave a Reply