कर्मवीर काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ – आमदार काळे

कोपरगाव :- राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचवर्षीय वेतनवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे.

दिवाळी सणाचे औचित्य साधत साखर कारखाना व संलग्न उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ व स्नेहभेट कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी १० टक्के वेतनवाढ लागू करण्याची दिवाळीची भेट कर्मचाऱ्यांना दिली. ज्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस दराच्या बाबतीत संवेदनशील आहे त्याप्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील तेवढाच संवेदनशील असून हि संवेदनशीलता मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यापासून जपली जात आहे.

त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या ५ वर्षाचे कालावधीसाठी सामंजस्य करार करून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी कराराची कार्यवाही व अंमलबजावणी करणेबाबत सूचित केले होते. त्याबाबत दि.१४ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने परिपत्रक प्रसिद्ध करून साखर कारखान्यांना कामगारांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

त्यानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. या निर्णयाचे कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत करून कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे याचे आभार मानले आहे.

सहकाराची मूल्य जपणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना परिसराचा विकासरुपी रथ असून या रथाला पुढे नेणारी दोन चाके म्हणजे ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि कर्मचारी आहेत. या दोघांच्या सामूहिक प्रयत्नांशिवाय या विकासरुपी रथाचा प्रवास अशक्य आहे. सभासदांच्या घामाच्या थेंबातून ऊस उगवतो आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमातून गोड साखर तयार होते  त्यामुळे कारखान्याच्या विकासरुपी रथासाठी या दोनही घटकांचे योगदान अमूल्य असून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय म्हणजे त्यांच्या निष्ठेचा, मेहनतीचा आणि समर्पणाचा सन्मान आहे. – आ.आशुतोष काळे.

Leave a Reply