चांदीच्या पादुका चोरणारा ४८ तासात जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : मंजूर येथील औदुंबरवाडी येथील श्री दत्त महाराज मंदिरातून चांदीच्या पादुका चोरी करणाऱ्याच्या मुसक्या कोपरगाव तालुका पोलिसांनी ४८ तासात आवळल्या.  मच्छिंद्र उर्फ शाहरुख संपत वाघ रा. माहेगाव देशमुख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक माहिती दिली ती अशी, ५ जानेवारी रोजी पहाटे मंदिरातील गाभाऱ्यातून सव्वा लाख रुपयांच्या चांदीच्या पादुका चोरीस गेल्या होत्या. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पथकाने भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज मिळाले पण आरोप निष्पन्न होत नव्हता.

पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर चौधरी यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे मच्छिंद्र उर्फ शाहरुख संपत वाघ रा. माहेगाव देशमुख यास अटक केली आहे. आरोपी काटवनात लपून बसला होता. त्यास अटक करून  त्याच्या कडून ८०० ग्रम वजनाच्या पादुका ताब्यात घेतल्या.सदरचा आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील असून त्याच्यावर यापूर्वी १२ दखल पात्र गुन्हे दाखल असल्याचे कोळी यांनी बोलताना सांगितले. अशा प्रकारच्या व इतर गुन्ह्यात नागरिक, ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोळी यांनी केले आहे.    

Leave a Reply