नगरपालिका तो झाकी है, जिल्हा परिषद, पंचायत समिती अभी बाकी हैं – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव नगरपालिकेचा विजय हा एकीचा विजय असून असत्याविरुद्ध सत्याचा विजय आहे. नगरपालिका झाकी हैं, जिल्हा परिषद पंचायत समिती अभी बाकी हैं..असा विश्वास देत युवा नेते विवेक कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी जोमाने करण्याचे आवाहन केले आहे तसेच यावेळी आमदार काळे यांनी ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचे गौडबंगाल लवकरच बाहेर येईल कारण शहरातील कारभार उघडा पडला तसाच ग्रामीण भागातील गैरकारभार आणि भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने निवडणुकी आधी केलेली ही नाटकी खेळी असल्याचा घणाघात कोल्हे यांनी केला.

कोपरगांव नगरपालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी पराग संधान यांची निवड तसेच जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आणि प्रसाद आढाव यांची कोपरगांव नगरपालीकेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची झाल्याबद्दल, समस्त शिरसगांव, सावळगांव, पढेगांव, कासली, दहेगांव बोलका, गोधेगांव, आपेगांव, तिळवणी, घोयेगांव ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, दोन महिने शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. ही निवडणूक नेते व कार्यकर्ते दोघांची होती. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच रेणुका कोल्हे यांनी प्रचारातून संपूर्ण शहर पिंजून काढले. या निवडणुकीत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीही पक्षाचा जोमाने प्रचार केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती २०१६ पासून विरोधकांच्या ताब्यात आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील त्यांच्याच होत्या.

मात्र एवढा काळ सत्तेत असूनही आपल्या परिसरात लक्षणीय असे कुठलेही विकास काम झालेले दिसत नाही. भविष्यात या सर्व गोष्टींवर लक्ष द्यायचे असेल, तर जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही. २०१४ मध्ये कोपरगाव मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून स्नेहलता कोल्हे निवडून आल्या. त्यांनी तालुक्याचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागात विशेषतः पूर्व भागामध्ये पालखेड डाव्या कालव्यातून कोळ नदीवरील साठवण व पाझर तलाव, गोधेगाव स्मशानभूमी, शिरसगाव–सावरगाव–गोधेगाव रस्ते, नांदूर मध्यमेश्वर कालव्यावरील ११ गावांची पाणी योजना, पालखेड डाव्या कालव्याच्या पोटचाऱ्या, तसेच अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध नसणे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणून सत्तेत गेल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फुटणार नाही.

सत्ताधारी आमदारांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तंबी दिल्याचे दाखवले असले, तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कारण सगळ्याच रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. जसा नगरपालिकेचा भ्रष्टाचार बाहेर निघाला, तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भ्रष्टाचारही बाहेर निघतो की काय, या भीतीने त्यांना खरंतर घाम फुटलेला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply