गौतम पब्लिक स्कूलमध्ये ‘खरी कमाई महोत्सव’ उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्योजक वृत्ती आणि प्रामाणिक कष्टातून मिळणाऱ्या कमाईचे महत्त्व रुजवण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी येथे अहिल्यानगर जिल्हा स्काऊट कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या खरी कमाई तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ मंगळवार (दि.१३) रोजी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते माईज गार्डन येथे करण्यात आला.

गौतम पब्लिक स्कूलच्या स्काऊट पथकाचे नाव महाराणा प्रताप तर गाईडचे पथकाचे कल्पना चावला होते. स्काऊट पथकांनी हस्तकला साहित्य, सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच पर्यावरणपूरक वस्तू तयार करून त्यांचे आकर्षक स्टॉल मंगळवार पासून गुरुवार पर्यंत उभारले होते. प्रत्येक स्टॉलवर पथकांनी स्वतः ग्राहक असलेल्या शिक्षक व पालकांशी संवाद साधत वस्तूंची माहिती दिली आणि व्यवहार केला.

उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, खर्च-नफा हिशोब, ग्राहक सेवा, वेळेचे नियोजन आणि संघभावना यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. केवळ पुस्तकी शिक्षण न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी खरी कमाई महोत्सवामुळे पथकांना मिळाली. खरी कमाई ही प्रामाणिक मेहनत, कौशल्य आणि सातत्यातूनच मिळते. लहान वयातच स्वावलंबनाची सवय लागल्यास विद्यार्थी भविष्यात आत्मविश्वासाने उभे राहू शकतात असे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले.  

 खरी कमाई सोबतच स्काऊट पथक महाराणा प्रताप व गाईड पथक कल्पना चावला यांनी महोत्सवाच्या कालावधीमध्ये शाळेच्या सुमारे शंभर एकर परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. यामध्ये माईज गार्डनमधील गुलाब बागेची साफसफाई तसेच गुलाबाच्या झाडांना पाणी देण्याचे उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवले.

स्काऊट, गाईड पथकांमुळे खऱ्या अर्थाने माईज गार्डन हे बहरलेले आहे. महोत्सवात पथकांची मेहनत व परिश्रम बघून खूप कौतुक वाटते अशा शब्दांमध्ये प्राचार्य नूर शेख यांनी पथकांचे कौतुक केले. यावेळी खरी कमाई करणाऱ्या पथकांचा प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्काऊट पथकांना स्काऊट इन्चार्ज नसिर पठाण व सोपान गांगुर्डे यांचे, तर गाईड पथकाला गाईड इन्चार्ज सुनीता शिंदे व कविता चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा.आ. अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे यांनी सर्व स्काऊट-गाईड विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सहशालेय उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण केली जाते. दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर व अहिल्यानगर भारत स्काऊट-गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने भिंगार येथे जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळावा होणार असून त्यात गौतम पब्लिक स्कूलचे स्काऊट व गाईड पथक सहभागी होणार आहे. साहसी स्पर्धा, चित्रकला, शेकोटी कार्यक्रम व शोभायात्रा अशा उपक्रमांत शाळेचे विद्यार्थी उत्कृष्ठ कामगिरी करतील चैताली  काळे

Leave a Reply