शेवगावात टंचाई आढावा बैठकीत तक्रारीचा पाऊस

आमदार राजळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : चालु वर्षीच्या पावसाळ्यातील तब्बल तीन महिन्याचा दीर्घ कालावधी संपला तरीही तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ५० टक्के देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. आता चार सहा दिवसात पाऊस झाला नाही तर रब्बी हंगाम ही अडचणीत सापडण्याचे चिन्ह आहे.

तालुक्यात दुष्काळाचे संकट उभे ठाकल्याने पिण्याचे पाणी, जनावरांचा  चारा, अपुरा वीज पुरवठा, पाट पाणी, त्यातच पिक विमा अग्रीम उचल, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, ई पीक पाहणी, ई केवायसी, मागील वर्षाची नुकसान भरपाई आदी शासकीय योजनांच्या अंमलबजावणी बाबत होत असलेला दुजाभाव आदी समस्याबाबत आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या तालुक्याच्या टंचाई आढावा  बैठकीत अनेकांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. त्यावर आमदार राजळे यांनी लगेच शासकीय यंत्रणांच्या सर्व विभागाने या अस्मानी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन समन्वयाने दिलासा देणारे काम करण्याच्या सूचना दिल्या.  

 तालुक्यात पीक लागवडी खाली ८० हजार हेक्टर क्षेत्र असून चालू खरीप हंगामात ६४ हजार १५३  हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी झाली आहे. याशिवाय उसाचे १५ हजार हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात कपाशीची सर्वाधिक ४६ हजार ७६१ हेक्टर लागवड झाली असून सध्या पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली आहे. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पन्नास मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

तालुक्यातील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी अर्ज दाखल केले असून ५५ हजार १६० हेक्टर क्षेत्रातील कपाशी तूर बाजरी भुईमूग आदी साठी सुमारे २७०कोटी रुपयांची रक्कम आरक्षित केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पावसात २१ दिवसाचा खंड पडलेल्या तालुक्यातील शेवगाव बोधेगाव व एरंडगाव अशा तीन मंडळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे रँडम पंचनामे करण्यात आले असून तालुक्याचा नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे.

    तालुक्यातील  चापडगाव, ढोरजळगाव व भातकुडगाव या तीन राहिलेल्या मंडळांचा पिकविमा अग्रीम मदत निधी योजनेत समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तालुक्यातील अंतरवाली बुद्रुक, भातकुडगाव गावठाण, चेडे चांदगाव, चापडगाव, ढोरजळगाव शे, ढोरजळगाव ने, गदेवाडी, कूरुडगाव, कोळगाव, गोळेगाव, हसनापूर, लाडजळगाव, सोने सांगवी, वडूले खुर्द, वरखेड, मुर्शदपुर, बेलगाव, वाडगाव, थाटे, माळेगांव, लखमापुरी आदीं गावात नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा वाढण्याची भीती असल्याने या ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

   तालुक्यातील ३७ गावात जलजीवन योजनेचे काम सुरू असून त्यास गती देण्याची मागणी करण्यात आली. सुकळी येथील पाणीपुरवठा योजना. शाळा इमारती याबाबत वारंवार तक्रारी करून ही न्याय मिळत नसल्याची तक्रार गावच्या सरपंचांनी तसेच खानापूर येथील पाईप लाईनच्या तक्रारीबाबत  पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी करण्यात आली.  बोधेगाव चापडगाव येथील कृषी विभागाचे कार्यालय नियमित सुरू राहावे. तालुक्यातील वडुले खुर्द येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची तसेच ग्रामसेवक हजर राहत नसल्याने त्यांना याबाबत समज द्यावी  अशी मागणी करण्यात आली.   

          तालुक्यातील ९६ हजार शेतकऱ्यांपैकी आज अखेर ३६ हजार शेतकऱ्यांनी ई पिक पाहनीची नोंद केली असून या उपक्रमास अधिक गती मिळावी. यासाठी संबधित तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना सत्वर कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.  

   प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे, गट विकास अधिकारी राजेश कदम, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी अतुल लोहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक,  ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापू पाटेकर, ताराचंद लोढे, भीमराज सागडे, दिनेश लव्हाट, वाय डी कोल्हे, आशा गरड, शिवाजी भिसे, कचरू चोथे, सुरेश आव्हाड, भाऊसाहेब पोटभरे, सुनील सिंह राजपूत यांनी चर्चेत सहभाग घेतला यांच्यासह गावगावचे सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी,  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समितीचे कक्ष अधिकारी कल्याण मुटकुळे यांनी सूत्रसंचलन केले.