आमदार काळेंच्या विरोधामुळे हजारो युवकांच्या रोजगाराची संधी गेली – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव तालुक्यात प्रस्तावित असलेल्या स्मार्टसिटी प्रकल्पाला तत्कालीन काळात आमदार काळे यांनी तीव्र विरोध केल्यामुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील १० ते १५ हजार युवकांना रोजगाराची संधी मिळाली असती, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळाला असता तसेच अनेक प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी उभे राहिले असते. मात्र, आमदार काळे यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या प्रकल्पाला विरोध दर्शविल्यामुळे स्मार्टसिटीचा नियोजित प्रकल्प तालुक्याबाहेर स्थलांतरित झाला असल्याचा आरोप युवानेते विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केला.  

युवानेते विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे यांच्या उपस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव तसेच भाजपा, आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश देवकर यांच्या वतीने टाकळी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात धारणगाव, ब्राह्मणगाव, खिर्डी गणेश, येसगाव, नाटेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोल्हे पुढे म्हणाले की, ब्लॅकलिस्टेड असलेल्या कंत्राटदारांना आमदार काळे यांचे पाठबळ आहे. हा प्रकार शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे सुज्ञ मतदारांनी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत योग्य कौल देत त्यांचा हा खेळ उधळून लावला. चांगल्या पद्धतीचे नगरसेवक निवडून दिले गेले असून, जे निवडून आले नाहीत ते देखील सकारात्मक पद्धतीने काम करत आहेत.

कोपरगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी व कोल्हे गट हे सर्वात मोठे राजकीय घटक असून, सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यात एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जोमाने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मागील नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकांमध्येही ‘गुलाल’ घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सोनेवाडी येथे शेतकऱ्यांची एकही गुंठा जमीन न घेता शेती महामंडळाच्या ५०० एकर जागेवर एमआयडीसी मंजूर झाली असून, त्यातील २५० एकर कोपरगाव तर २५० एकर राहता तालुक्यातील आहे. मात्र या एमआयडीसीचा उल्लेख ‘शिर्डी एमआयडीसी’ असा होत असून ‘शिर्डी-कोपरगाव एमआयडीसी’ असा संयुक्त उल्लेख होणे गरजेचे आहे. तसेच भरती प्रक्रियेत कोपरगाव तालुक्याला कमी प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज पाणीपुरवठा होत असताना कोपरगावकरांना वर्षातून अवघ्या ६० ते ७२ दिवसच पाणी मिळते, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचा आरक्षण जवळपास ५८ टक्क्यांपर्यंत गेले असून, सरकारच्या धोरणानुसार पिण्याच्या पाण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात औद्योगिकीकरण व सिंचन या दोन्ही बाबींना समान महत्त्व देण्यात आले. त्यामुळे ७० हून अधिक पाणीपुरवठा योजना कोपरगाव तालुक्यात लागू झाल्या.

पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असून, या प्रकल्पाला सुरुवातीला ‘दुष्काळमुक्त मराठवाडा’ असे नाव देण्यात आले होते. मात्र यामध्ये नाशिक-नगर जिल्ह्यांचा समावेश होणे आवश्यक असल्याने स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून ‘नाशिक-नगर-मराठवाडा’ असा उल्लेख व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जनजागृती व एकीच्या बळावर पाणी, रोजगार व नोकरीचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply