कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्ववान, समाजकारण आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. ही बातमी अत्यंत दुर्दैवी, मनाला वेदना देणारी आणि विश्वास बसणार नाही अशी आहे.

२७ जानेवारी रोजी, मंगळवारीच युवानेते विवेक कोल्हे यांची मुख्यमंत्री दालनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी भेट झाली होती. या भेटीत अजित दादांनी कारखान्यांपासून ते विविध विकासकामांपर्यंत अनेक विषयांवर अत्यंत आपुलकीने विचारपूस केली. कामातील शिस्त, स्पष्ट भूमिका आणि रोखठोक स्वभाव हीच दादांची खरी ओळख होती. समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेणारा, विकासासाठी झटणारा आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांचे स्थान अतुलनीय होते.

अवघ्या चोवीस तासांच्या आत अशी दुःखद बातमी कानावर येईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. राजकीय पटलावरील अतिशय आवडते नेते, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेले अजितदादा पवार आता आपल्यात नाहीत, ही जाणीव अत्यंत वेदनादायी असल्याची भावना युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. दादांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व पुढे लाभणार नाही, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

कोल्हे परिवार तसेच संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्राच्या या “दादांना” भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि नेतृत्वाचा वारसा कायम प्रेरणादायी राहील. ईश्वराने दादांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो तसेच या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला देवो, हीच प्रार्थना.


