कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : निसर्ग जसा निस्वार्थ प्रत्येक व्यक्तीला काही ना काही देतो, तसेच दत्तात्रेय खेमनर गेली १७ वर्षे हेल्पिंग हंॅड्सच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थांच्या पाठीशी उभे आहेत. विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा, आपली विचारधारा स्पष्ट ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन जीएसटीचे सेवानिवृत्त कमिशनर चंद्रकांत मंचरे यांनी केले.

आर्थिकदृष्ट्या गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थांना हेल्पिंग हंॅड्स या स्वयंसेवी संस्थेंच्या वतीने उच्च शिक्षणाकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. धनादेशाचे वाटप सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एसएसजीएम महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. व्यासपीठावर संस्थापक दत्तात्रेय खेमनर,अविनाश घैसास होते.

प्रास्ताविकात खेमनर म्हणाले, संस्थेने १३९ विद्यार्थांना उच्चशिक्षणासाठी आजअखेर ७५.३२ लाख रुपयांची मदत केली. मदत घेतलेले काही विद्यार्थी परत मागे वळून बघण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चालू वर्षीपासून संस्थेने बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. कुठलीही शासकीय मदत न घेता संस्थेविषयी आस्था असणारे दानशूरांच्या मदतीतून हे कार्य सुरु आहे.

उत्तमराव भडांगे यांनी कै. काळूजी भडांगे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची कायमस्वरूपी ठेव, किशोर सारडा यांनी १० हजार ,चंद्रकात मंचरे ,प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत यावेळी जाहीर केली.

प्राचार्य डॉ. सरोदे यावेळी म्हणाले, हेल्पिंग हंॅड्सला मदत म्हणजे खर्च नसून एका विद्यार्थ्याचे भविष्य घडविणारा आनंद आहे.हि समाजाच्या भविष्याची गुंतवणूक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण व वेळ या दोन शक्तींचा वापर करून देश, गाव व समाजाचे नाव उज्वल करावे.

यावेळी के.जे.सोमैया महाविद्यालयाचे विश्वस्त संदीप रोहमारे, लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात , पुरुषोत्तम पगारे, विठ्ठलराव शिंदे , डॉ. रमेश सोनवणे, अण्णासाहेब बावके, सुनील बोरा आदीसह विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.


