नवरात्रोत्सव साधेपणाने; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा संकल्प – रेणुका कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव २०२६ ला ११ ऑक्टोबर रोजी तहसील मैदान, कोपरगाव येथे मोठ्या धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. यावेळी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीची पूजा-अर्चना करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान तसेच त्यांच्या पत्नी सौ. मोनिकाताई संधान यांनी पूजेत सहभाग घेऊन दुष्काळ निवारणासाठी ११ हजार रुपये रोख निधीची मदत केली.कोपरगावच्या प्रथम महिला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान हा नवरात्रोत्सव सुरू राहणार आहे. दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा उत्सव यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनाला मदत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या की, दरवर्षी नवरात्रोत्सवाचे थाटामाटात आयोजन केले जाते; मात्र यंदा दुष्काळाचे सावट असल्याने उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून पुढील नऊ दिवस देवीची भक्ती व आराधना करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी वाचला तर आपण सर्वजण वाचू, त्यांनी पिकवले तरच आपण खाऊ. सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आहेत, तसेच त्यांना पशुधन जगविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने, परंतु भक्तिमय वातावरणात साजरा करून कोपरगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनाला शक्य तितकी मदत करण्याचा संकल्प केला आहे.

तालुक्यात पाण्याची कमतरता जाणवत असून, दुष्काळामुळे शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहेत. पिकांचे नुकसान होत असताना पशुधन जगविण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी देणगी कक्ष उभारण्यात आला असून, ‘कोपरगाव तालुका दुष्काळ निधी’ म्हणून देणगी स्वीकारली जात आहे. या निधीतून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनाला मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

१३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता दुष्काळ निवारणासाठी देवीला साकडे घालण्यासाठी जुनी गंगा येथे पायी प्रस्थान करण्यात येणार आहे. यासाठी कोपरगाव येथील जिजामाता उद्यान, स्वामी समर्थ केंद्र येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे आणि कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा सुख, समृद्धी व भरभराट नांदावी, अशी प्रार्थना सर्वजण मिळून देवीकडे करणार आहेत. धार्मिक परंपरा जपत दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.यावेळी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply