पोहेगाव पतसंस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रात कामकाजाचा मार्ग मोकळा – औताडे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 30 : अहील्यानगर जिल्यातील अग्रगण्य संस्था पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव या संस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संस्थेला संपूर्ण महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात कामकाज करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संस्थेचे सस्थापक नितिनराव औताडे यांनी दिली आहे.

संस्थेचा सध्या कारभार नाशिक व पुणे विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये सुरू होता. संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे कार्यक्षेत्र वाढावे व संस्थेचा कारभार चालवा यासाठी संस्थेचे संस्थापक नितिनराव औताडे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने, सर्व संचालक मंडळ संस्थेचे व्यवस्थापक सुभाष औताडे, सह व्यवस्थापक विठ्ठल घारे, आप्पासाहेब कोल्हे, मोजड प्रयत्न करत होते.

दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या उपविधी दुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रवाढीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १३ (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी या उपविधी दुरुस्तीला अधिकृत मंजुरी दिली आहे.

या मंजुरीमुळे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापुरते विस्तारित झाले आहे. यामुळे संस्थेला राज्यभरातील आर्थिक व्यवहारांचा विस्तार करण्याची आणि सहकार क्षेत्रातील आपले कार्य अधिक व्यापक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 सभासदांच्या विश्वासातून उभ्या राहिलेल्या या संस्थेने 232 कोटींच्या टप्पा पार केला असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात 2 कोटी 64 लाख रुपये नफा झाला आहे .सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्थेने दिवाळीपूर्वीच 9 टक्के लाभांश वाटप सुरू केले असल्याचेही औताडे यांनी सांगितले. ही संस्था आता राज्यस्तरावर कार्यविस्ताराच्या दिशेने वाटचाल करणार असून, कार्यक्षेत्रवाढीचा निर्णय संस्थेच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Leave a Reply