शिंदे वस्ती ते दहीफळ रस्त्याची झाली दूर्दशा, शाळकरी मुले त्रस्त

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ :  सध्या होत असलेल्या पावसाने तालुक्यातील नवीन दहिफळ ते शिंदे वस्ती या रस्त्याची  अत्यंत दूर्दशा केली आहे. या रस्त्याने वस्तीवरुन  रोज गावात शाळेसाठी जाणारी बाल शाळकरी मुले अक्षरश: रडकुंडीला येतात. अनेकदा या रस्त्याच्या  दुरुस्तीची मागणी करूनही ती होत नसल्याने ग्रामस्थांनी एक ऑक्टोबरला थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

     शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना मोठ्या कसरतीने शाळेत जावे लागत आहे. सध्या धडधाकट माणसाला देखील या रस्त्याने साधे चालणे मुश्किल होते .एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे चिखलाची चिडचिड निर्माण झालेली असते, या वस्तीवर प्राथमिक शाळेची सोय नसल्याने लहान मुलांना शिक्षणासाठी  गावामध्ये जावे लागते.  हे किमान एक किलोमीटरचे अंतर रोज चिमुरड्यांना  चिखल तुडवत  जाण्याची वेळ आलेली आहे. 

गेल्या कित्येक दिवसापासून हे हाल आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी रस्त्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा  राजश्री घुले यांनी या रस्त्याचे खडीकरणाचे काम  मंजूर करुन मार्गी लावले होते. मात्र ते कामही अर्धवटच झाले.  रस्त्यालगतचे  शेतकरी दरवर्षी या रस्त्याचा चिखल जेसीबिने काढतात. मात्र हा परिसर काळवटीचा असल्याने पाऊस झाला की पुन्हा  चिखलाने माखतो.  अधूनमधून पडलेल्या खड्ड्यात गाळमिश्रित पाण्याची डबकी साचतात.

            नवीन दहिफळ ते शिंदे वस्ती रस्ता मंजूर व्हावा याकरिता ग्रामपंचायतीने अनेक वेळा ठराव करून जिल्हा परिषद अध्यक्ष,आमदार, खासदार यांना दिले आहेत . मात्र  ग्रामस्थांच्या या मागणीकडे  कुणीही गांभीर्याने लक्ष घातले नाही .  काही दिवसांपूर्वी नवीन दाहिफळ ग्रामस्थांनी  खासदार डॉ. सुजय विखे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना संबंधित रस्त्यांच्या कामाच्या मागणीचे निवेदन दिले आहे. मात्र त्याचे कडून ही अद्याप काही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे  ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अखेर ग्रामस्थांनी  थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या एक ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.