पालिकेचे कर विभागातील ५ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

मुल्यांकन यादीची तपासणी न केल्याचा ठपका, मुख्याधिकारी यांची माहिती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : शहरातील वाढीव घरपट्टी प्रकरणी ठेकेदाराने केलेल्या सर्व्हेक्षणाचे योग्य पद्धतीने तपासणी न केल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कर विभागातील पाच कर्मचाऱ्याना निलंबित केले आहे. मुख्य लिपिक संजय तिरसे, रवींद्र वाल्हेकर, राजेंद्र शेलार, राजेंद्र इंगळे, रत्नप्रभा अमोलिक अशी आज निलंबित केलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत.

याबाबत मुख्याधिकारी गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले कि, गेल्या दीड वर्षापासून शहरातील वाढीव हद्दीसह मालमत्ताधारकांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आर.एस. कन्स्ट्रक्शन कंपनी (नागपूर) या ठेकेदाराने सर्व्हे करून कर निर्धारण यादी कर विभागाला सादर केली होती. मालमत्ता सर्व्हेक्षण करिता सादर केलेल्या फॉर्मची कर विभागातील संबंधित कर्मचाऱ्यानी त्याची तपासणी करावी आशा स्पष्ट सूचना१० मार्च २०२१ च्या पत्रान्वये कर अधिकारी यांनी दिल्या होत्या.

तसेच ६ में २०२१ च्या आदेशानुसार प्रत्यक्ष दर्शी जागेवर जाऊन पाहणी करून ज्या मिळकती मध्ये त्रुटी आहेत त्याबाबतचा अहवाल सादर करणेबाबत कळविले होते. तसेच सदरचे सर्व्हे केलेले फॉर्म ३ जून २०२१ च्या अदेशांव्ये तपासून जमा करणेबाबत स्पष्ट सूचना कर अधिकारी यांना दिलेल्या असताना ही डिमांड मध्ये नमूद मालमत्ताधारकांच्या मालमत्ताकरामध्ये क्षेत्रफळ, बांधकामातील बदल, जमिनीच्या क्षेत्रातील वाढ यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रुटी झालेल्या असल्याचे नागरिकांकडून कर निर्धारण यादीवर हरकती घेतल्या.

त्यामध्ये तथ्य असल्याचे कर अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालावरून दिसून येत आल्याने संबंधित कर्मचार्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील ४ (१)अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ कलम ७९ (२)अन्वये मालमत्ता प्राप्त केलेल्या अधिकाराचा वापर करून नगर परिषद सेवेतून पाच कर्मचार्यावर तात्काळ निलंबण केले असून पुढे शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

शहरात घरपट्टी वाढीच्या विषयावरून तापलेल्या वातावरणात निष्काळजीपणा केल्यामुळे पाच कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून घराचा रस्ता दाखवला. तर ज्या ठेकेदाराने चुकीचा सर्व्हे करून वातावरण पेटवले त्या आर.एस. कन्स्ट्रक्शन कंपनीवर रीतसर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.