साखळी उपोषणाला विविध संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा

वाढीव घरपट्टी रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार   

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने मंगळवार (२७ सप्टेंबर) पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर दर्शवला. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी बुधवारीही हे उपोषण सुरूच होते. वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणीचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत शहरातील मालमत्ताधारकांचा सर्व्हे करून घेतला; परंतु आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केलेले असताना त्याची दखल न घेता आणि या कंपनीने दिलेल्या सदोष अहवालाच्या आधारे सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मालमत्ताधारकांवर लादलेली अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २७ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी आणि न. प. अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी तब्बल दोन तास चर्चा केली; परंतु या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विजय आढाव, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, विनोद राक्षे, अतुल काले, प्रशांत कडू, संदीप देवकर, अशोक लकारे, जितेंद्र रणशूर, बबलू वाणी, सागर जाधव आदीसह अन्य उपोषणकर्त्यांनी यावेळी वाढीव घरपट्टीबाबत न. प. मुख्याधिकारी शांताराम गोसावी व अन्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना धारेवर धरले. त्यावर गोसावी व अन्य न. प. अधिकारी निरुत्तर झाले. पहिल्या दिवशी झालेली ही चर्चा निष्फळ ठरली.  

दरम्यान, कोपरगावकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या उपोषणास भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रविकाका बोरावके, पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष कैलास ठोळे यांच्यासह शहरातील अनेक मालमत्ताधारक नागरिकांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. आज कोपरगाव व्यापारी महासंघाचे राजेंद्र बंब, सुधीर डागा व इतर पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेचे प्रसाद नाईक व इतर पदाधिकारी, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष निसार शेख व इतर पदाधिकारी, लब्बैक सोशल फाउंडेशनचे अकबरभाई शेख व इतर पदाधिकारी, हनुमाननगर येथील हनुमान मित्रमंडळाचे विनोद दुकळे व इतर पदाधिकारी, लाड सुवर्णकार संस्थेचे प्रकाश विश्वनाथ भडकवाडे व इतर पदाधिकारी, महात्मा फुले मंडळाचे प्रदीप नवले, विशाल राऊत व इतर पदाधिकारी, कर्ण ग्रुप, हनुमाननगर,

कोपरगावचे सनी धिवर व इतर पदाधिकारी, दत्तनगर-गोरोबानगर येथील राजमुद्रा फाउंडेशनचे अविनाश पाठक व इतर पदाधिकारी, श्री संत सावता माळी युवक संघाचे मुकुंद मामा काळे व इतर पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतीश काकडे व इतर पदाधिकारी, मोहनीराजनगर, बेट येथील हिंदूसम्राट संघटनेचे बापू काकडे व इतर पदाधिकारी, हिंदू एकता तरुण मंडळाचे (फडे चौक) विजय चव्हाणके व इतर पदाधिकारी, कोपरगाव मुद्रण असोसिएशनचे संजय कोपटे व इतर पदाधिकारी, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव आढाव व इतर पदाधिकारी आदी अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच साई देवा प्रतिष्ठानचे दीपक वाजे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. 

कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वाढीव घरपट्टी लागू करण्याचा निर्णय तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टीची आकारणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.