करवाढ संदर्भात आमदार काळेंनी उचलेलं पाऊल कायदेशीर – विधीज्ञ शंतनू धोर्डे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९: कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील नागरिकांवर लावलेली अवास्तव करवाढ हि बेकायदेशीर आहे. त्याबाबत कायदेशीर पद्धतीने त्यातून मार्ग निघणार असून आ. आशुतोष काळेंनी उचललेलं पाऊल कायदेशीर असून त्या माध्यमातून कोपरगावकरांना निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ विधीतज्ञ शंतनू धोर्डे यांनी व्यक्त केला आहे. 

कोपरगाव नगरपरिषदेने खाजगी कंपनीकडून केलेल्या सर्व्हेतून केलेली केलेली करवाढ चुकीची त्याबरोबरच बेकायदेशीर आहे. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी बैठक घेवून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेवून त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने सविस्तर खुलासा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरपरिषदेने खुलासा केल्यानंतर करण्यात आलेली करवाढ चुकीची व करवाढीच्या बजावण्यात आलेल्या नोटीसा देखील बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्याचबरोबर करण्यात आलेली करवाढ करतांना मालमत्तेचा होणारा घसारा कुठेही धरण्यात आला नव्हता. अशा अनेक बेकायदेशीर बाबी आ. आशुतोष काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच नगरपरिषद प्रशासनाणे देखील चुका मान्य करून योग्य तो बदल करण्याच्या सूचना दिल्या. नगरपरिषद प्रशासनाणे जबाबदारी स्विकारत ज्या खाजगी कंपनीने हा सर्व्हे केला आहे त्या कंपनीला बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हे सर्व बदल झाल्यानंतर करण्यात आलेली करवाढ हि कमी होणार आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळेंनी अवलंबिलेला मार्ग १००% कायदेशीर असून या मार्गानेच हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रशासना सोबत राहून, प्रशासनाशी चर्चा करून कायदेशीर मार्गाने जावे लागणार आहे.

यामध्ये करवाढ कमी करण्याबाबत दुरुस्ती प्रस्ताव सादर करणे, त्याला मंजुरी मिळविणे, समितीपुढे मंजुरी घेणे या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे यामध्ये काही अवधी निश्चितपणे जाणार असला तरी आ. आशुतोष काळे यांनी जे धोरण अवलंबिले आहे व जो कायदेशीर मार्ग निवडला आहे तो अगदी योग्य असून कोपरगावकरांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ विधीतज्ञ शंतनू धोर्डे यांनी व्यक्त केला आहे.