कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील प्रसाद मनोज कुलकर्णी या १७ वर्षीय प्रसादने कोळसा वापरून चक्क ७.२५ बाय ३.२५ फूट या आकाराची छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यदिव्य सुंदर प्रतिकृती साकारली आहे.
अगदी कमी वयात छत्रपती शिवरायांची अत्यंत देखणी प्रतिकृती साकारणाऱ्या प्रसाद मनोज कुलकर्णी याचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी प्रसाद मनोज कुलकर्णी याचा यथोचित सन्मान करून त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राहुल वाणी, विजयराव जाधव, विलास भाकरे, नजीम शेख, डॉ.म्हस्के, मनोज कुलकर्णी, दशरथ भवर, बबलू बागवान, राहुल जगझाप आदींसह मान्यवर उपस्थित होते.
धामोरी येथील रहिवासी असलेला प्रसाद मनोज कुलकर्णी याला लहान वयापासून चित्रकलेची आवड आहे. कोरोना महामारीच्या काळात आपला चित्रकलेचा छंद जोपासून प्रसाद कुलकर्णी याने जवळपास शंभर चित्रे रेखाटली आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना गृहपाठ किंवा अभ्यासाचा ताण नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गाणे, नाचगाणे, वाचन, लेखन, अभ्यास यात वेळ घालवला. काही विद्यार्थ्यांनी मौजमस्ती केली.
मात्र, या काळात प्रसाद कुलकर्णी याने आपला चित्रकलेचा छंद जोपासत जवळपास १०० चित्रे रेखाटली. प्रसाद कुलकर्णी हा सुंदर चित्रे काढतो. त्याच्या चित्रांमध्ये जिवंतपणा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारावे, अशी कल्पना प्रसादच्या मनात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण सिंहासनावर बसलेली रुबाबदार, भरजरी अंगरखा, मोत्यांचा मुकूट, कंबरेला जरीचा शेला, हिरेजडित चमकणारी तलवार, पायातल्या नक्षीदार मोजड्या, गळ्यात सुंदर अलंकार, भरदार दाढी, पिळदार मिशा, धारदार नाक आणि तेजस्वी करारी नजर असे सुंदर चित्र प्रसादने रेखाटले. हे चित्र काढण्यासाठी त्याने कोळसा खडूचा वापर केला आहे.
प्रसाद कुलकर्णी याने कॉलेज सांभाळून फक्त आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे २१५ बाय १२५ सें.मी. लांबीचे ७.२५ बाय ३.२५ फूट असे भव्यदिव्य चित्र साकारले आहे. या चारकोल स्केचच्या माध्यमातून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नामांकन करण्याचा प्रसादचा मानस आहे. प्रसाद कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्यदिव्य चित्रकृती साकारल्याबद्द्ल विवेक कोल्हे यांनी त्याचे कौतुक करून त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.