कोपरगाव प्रतिनिधी, दि.३ : परमेश्वराने आपल्याला खूप काही दिले आहे. महिलांनी कधीही स्वत:ला कमी समजू नये. स्वत:मधील ताकद ओळखून आत्मविश्वासाने जगले पाहिजे. एकमेकींच्या सुख-दु:खात सहभागी होण्याबरोबरच एकमेकींना आधार दिला पाहिजे. कोरोना महामारीच्या काळात अनेक महिलांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले; परंतु त्या महिला न खचता स्वाभिमानाने जीवन जगत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. महिलांनी जीवनात कितीही संकटे आली तरी न खचता, न हरता हिमतीने जगायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी केले. महिलांनो खचू नका, हिम्मत हारू नका, आता रडायचे नाही तर लढायचे आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा तसेच नवरात्र उत्सवानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘मिस कोपरगाव’ पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ या स्पर्धांमधील विजेत्यांना भाजप प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे बोलत होत्या.
कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात रविवारी (२ ऑक्टोबर) हा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, मोनिका पराग संधान, माजी नगरसेविका शिल्पा रवींद्र रोहमारे, दीपा वैभव गिरमे, मंगल बाळासाहेब आढाव, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, हर्षदा कांबळे, अनिता मुरकुटे आदींसह विजयी स्पर्धक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या समारंभात स्नेहलता कोल्हे आणि रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या राजश्री स्वप्नील सोनवणे (गोरक्षनाथ कॉलनी, बाजारतळ, कोपरगाव) यांना रोख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या सलोखा बाळकृष्ण दोडे (ब्राह्मणगाव) यांना रोख ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या सुजाता मनोहर शिंदे (वृंदावननगर, साई सिटी, खडकी रोड, कोपरगाव) यांना रोख ५ हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात आले. घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजयी स्पर्धक प्रमोद शरदराव दरपेल (भगवती भोजनालय, कहार गल्ली, कोपरगाव) यांना प्रथम क्रमांकाचे रोख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या अर्चना निलेश मुंदडा (कोपरगाव) यांना रोख ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या वासंती हेमंत गोंजारे (कमलकुंज निवास, येवला रोड, कोपरगाव) यांना रोख ५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन यावेळी गौरविण्यात आले.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने ‘सन्मान आदिशक्तीचा, अभिमान नारीशक्तीचा’ अंतर्गत ‘मिस कोपरगाव’ आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ स्पर्धा आयोजित केली होती. या दोन्ही स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘मिस कोपरगाव’ पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत स्वाती मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘मिस कोपरगाव’ होण्याचा बहुमान मिळविला, तर स्नेहा पंजाबी यांनी द्वितीय आणि चित्रा घुमरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी स्नेहलता कोल्हे व रेणुका कोल्हे यांच्या हस्ते स्वाती मुळे यांना सोन्याची नथ, स्नेहा पंजाबी यांना चांदीचा करंडा आणि चित्रा घुमरे यांना चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले. ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी पटकावलेल्या अश्विनी विक्रांत सोनवणे यांना रोख ७००१ रुपये, द्वितीय क्रमांकाची मानाची पैठणी जिंकलेल्या संगीता गोरखनाथ महाजन यांना रोख ५००१ रुपये तर तृतीय क्रमांकाची मानाची पैठणी जिंकलेल्या योगीता प्रीतम बागरेचा यांना रोख ३००१ रुपये पारितोषिक स्नेहलता कोल्हे व रेणुका कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, संजीवनी महिला मंडळ, संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. राजकारणात काम करण्यापूर्वी मी महिला मंडळांमध्ये काम करीत होते. महिलांच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. महिला, महिलांचे प्रश्न, त्यांचे आरोग्य, महिलांचे सबलीकरण, महिला स्वावलंबी कशा होतील, त्या स्वाभिमानाने कशा जगतील यासाठी काम करणे मला आवडते. संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना मदत करून त्यांना सक्षम बनविण्याचे काम मला करता आले याचे खूप समाधान वाटते.
गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे विविध सण, उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यावर आपल्यावर निर्बंध आले होते. सुदैवाने कोरोना संक्रमणाची लाट ओसरल्याने आता आपण सर्वजण दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात सण, उत्सव साजरा करत आहोत. नवरात्रात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. यंदा संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गट आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानिमित घरगुती गौरी गणपती सजावट, घरगुती गणपती सजावट स्पर्धा ‘मिस कोपरगाव’ पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगून सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
महिला कुटुंबाचा डोलारा सांभाळत असताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत स्त्री आपल्या घरातील सर्वांची सरबराई करण्यात गुंतलेली असते. न थकता ती सर्व कामे करत असते. लग्नानंतर स्त्रीचे माहेर सुटते आणि ती सासरी जाते. सासरी गेल्यानंतर ती तिकडे रममाण होते. सासरच्या लोकांचे स्वभाव समजून घेऊन सारे काही ॲडजस्ट करून घेते. ती सहनशील तर असतेच; पण तिच्यामध्ये लवचिकता असते. महिलांच्या पोटात कधी काही राहत नाही. त्या एकमेकींजवळ मन मोकळे करतात. हे जरूर करा; पण विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असे कोल्हे यांनी सांगितले. यावेळी साक्षी राऊत यांनी भरतनाट्यम आणि श्रावणी राहुल भागवत या ९ वर्षीय चिमुकलीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. त्यांचे स्नेहलता कोल्हे यांनी कौतुक केले.
कोपरगाव शहरातील नगर परिषद प्रशासनाने मालमत्ताधारकांच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे प्रस्तावित केलेल्या अवास्तव घरपट्टी व मालमत्ता करवाढीला स्थगिती मिळवून शहरातील २५ हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल भाजपच्या प्रदेश स्नेहलता कोल्हे यांचा भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली विजयराव आढाव यांच्या हस्ते यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांचे चुकीचे सर्वेक्षण केलेले असताना नगर परिषद प्रशासनाने या कंपनीचा सदोष अहवाल स्वीकारून घरपट्टी व मालमत्ता करात अवास्तव भरमसाठ वाढ केली. या करवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. ही करवाढ रद्द करावी, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने कोपरगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २७ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले होते. चार दिवस चाललेल्या या साखळी उपोषणाला अडीचशेहून अधिक संघटना, महिला मंडळे आणि शहरातील असंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला. स्नेहलता कोल्हे यांनी या उपोषणात चौथ्या दिवशी स्वत: सहभाग नोंदवून हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण स्थळापासून हलणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. स्नेहलताताई कोल्हे यांनी उपोषण स्थळावरूनच थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या उपोषणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना वाढीव घरपट्टीला स्थगिती देण्याबाबत निर्देश दिले. कोल्हे यांनी जाचक घरपट्टी व मालमत्ता करवाढीला स्थगिती मिळवून दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोल्हे यांचे शहरवासियांकडून अभिनंदन केले जात आहे.