कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्हयाच्या प्रमुख वर्दळीच्या असलेल्या कानळद फाटा ते कोळपेवाडी राज्य मार्ग क्रमांक ७ हा रस्ता रहदारीस अतिशय मोठया प्रमाणांत खराब झालेला असुन त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे, निरपराध व्यक्तींचे बळी जात आहेत तेंव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण होवुन मिळावे या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांना चासनळी पंचक्रोशीतील रहिवासीयांनी दिले. सौ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देवुन या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनेष गाडे म्हणाले की, अहमदनगर आणि नाशिक जिल्हयातील शेतक-यांच्या दृष्टीने हा रस्ता प्रमुख रहदारीचा असुन शेतमालाची मोठया प्रमाणांत ने आण होत असते. मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्यांने त्यावरून वाहतुक करतांना जिकरीचे झाले आहे, रस्त्यास प्रचंड खडडे पडले आहेत. त्याच्या दुरूस्तीसाठी या पंचक्रोशीतील प्रवाशांसह शेतक-यांनी उपोषणाचा इशारा दिला होता त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधीत विभागाने या रस्त्याचे काम तात्काळ हाती घेवु म्हणून आश्वासन दिले पण हे काम अजुनही पुर्ण होत नाही. रात्री अपरात्री या रस्त्यावरून दवाखान्यात रूग्णांना ने आण करणेही अवघड झाले आहे.
खडडयामुळे अपघाताचे प्रमाण वाढुन त्यात निरपराध व्यक्तींचे बळी जात आहेत. खरीप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे त्यातील उत्पादीत शेतमाल जिल्हयाच्या ठिकाणी वाहनांने नेतांना शेतक-यांना कसरत करावी लागत आहे, वाहनचालकांच्या वाहनांचे नुकसान वाढले आहे तेंव्हा या प्रकरणी तातडीने लक्ष देवुन कानळद फाटा ते कोळपेवाडी राज्य मार्ग क्रमांक ७ च्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेवुन पुर्ण करावे असे सर्वश्री. विजय गाडे, बाबुराव महाराज चांदगुडे, मनोज गाडे, राहुल चांदगुडे, विनायक गाडे, निलेश ब्राम्हणे, देविदास गाडे, सुनिल सुरभैय्या यांनी म्हटले आहे.