पाच जनावरांचा मृत्यु झाल्याने शेतक-यांच्या चिंतेत वाढ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : शेवगाव तालुक्यात जनावरांच्या लम्पी सदृश्य आजाराची संसर्गजन्य साथ वाढत असून आज अखेर पाच जनावरांचा मृत्यु झाल्याने शेतकरी पशुपालकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लसीकरण झालेल्या जनावरात देखील लम्पी सदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने शेतक-यांच्या चिंतेत अधिक वाढ होत आहे.

तालुक्यात गाय सवर्गातील जनावरांची संख्या ७५ हजाराच्या आसपास असून तालुका पशुसंवर्धन विभागाकडे आतापर्यंत लसीचे ७१ हजार ढोस उपलब्ध झाले असून आज अखेर ६६ हजार ३४८ जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चारुदत्त असलकर यांनी दिली.

        आत्तापर्यंत १४३ जनावरे बाधित आढळली असून यापैकी ६९ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून सध्या ६९ जनावरांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला असून तालुक्यातील भायगाव व दहीगाव येथे प्रत्येकी दोन तर मजलेशहर येथे एक अशा एकूण पाच जनावारांचा लम्पी मुळे मृत्यू झाला आहे. लम्पी सदृश्य आजाराच्या प्रादुर्भावासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीचे लसीकरण व बाधित जनावरांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

      शेतकरी पशुपालकांनी लसीकरण व बाधित जनावरांच्या उपचारासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी व सर्व संबधितांशी संपर्क साधण्याचे आवाहन गटविकास अधिकारी महेश डोके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.असलकर यांनी केले आहे. शेवगाव तालुक्यात जनावरांच्या लम्पी सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे डॉ.असलकर यांनी सांगितले.