३४ हजार हेक्टरवरील उभे पिकं झाली आडवे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : तालुक्यात यावर्षी विक्रमी पाउस पडल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडांशी आलेल्या पिकांना जलसमाधी मिळाली. दरवर्षा पेक्षा यावर्षी सरासरी चारशे टक्के पाऊस ज्यास्तीचा पडल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फटका बसला.
या चालु हंगामात सलग पावसाच्या सरीवर सरी बरसत राहील्या. ओढे, नदी, नाले तुडुंब भरले. संपुर्ण तालुका जलमय झाला. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मका, कापुस, फळबागा पावसाच्या पाण्यामुळे होत्याच्या नव्हत्या झाल्या. कोपरगाव तालुक्याच्या कृषि विभाग व महसूल यंञणेने केलेल्या पंचनाम्यात यावर्षी सरासरी ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले आहे. तालुक्यातील यावर्षी ५३ हजार १०५ हेक्टर क्षेञात पिकांची लागवड करण्यात आली होती त्यापैकी तब्बल ३४ हजार ४२२ हेक्टर शेतातील उभ्या पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.
तालुक्यातील अंदाजे ४६ हजार ३२५ शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होवून आर्थीक संकट निर्माण झाले. कर्ज काढून घेतलेल्या पिकावर निसर्गाने अवकृपा दाखवल्याने तालुक्यातील बळीराजा पुर्णपणे कोसळला आहे. आजुनही मुसळधार पावसाचा जोर सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता दाट आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे व पंचनामे करण्याचे काम तहसिलदार विजय बोरुडे व तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व कृषि सहाय्यक अधिकारी काम करीत आहेत. येत्या सोमवारी अंतिम याद्या करण्याचे काम केले जाणार आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत बाधीत झालेल्या पिकामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सोयाबीन १८हजार हेक्टर, मका ८ हजार हेक्टर, कापुस २हजार हेक्टर, फळपिके २०० हेक्टर,बाजरी ३५० हेक्टर, भुईमूग २०, टोमॅटो १७५, हेक्टर आदी पिकांचे अंदाजे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.
दरम्यान तालुक्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या आर्थीक नुकसानीचा सरासरी अंदाज महसुल विभागाने वर्तवला असुन त्या अंदाजावरुन ८६ कोटी २० लाख रुपयाचे आर्थीक नुकसान झाल्याचा अंदाज तहसीलदार विजय बोरूडे यांनी वर्तवला असुन तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे ८६ कोटी २० लाखाची मागणी केल्याची माहीती त्यांनी दिली आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे योग्य ते पंचनामे करुन आर्थीक मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी सांगिले आहे. आपण मागणी केलेल्या मदतीपैकी शासन किती पैसे मंजुर करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. करोनाच्या संकटातुन नुकताच तालुका सुधारण्याच्या तयारीत असताना यावर्षी पावसाने रौद्ररूप धारण करून तालुक्याचे आर्थीक कंबरडे मोडले.
हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी पावसाने केली. उभे पिकं डोळ्यांदेखत पाण्यात गेली. केलेली मेहनत, गुंतवलेला पैसा वाया गेला.आता झालेल्या नुकसानीच्या बदल्यात यापुढे शासन किती हातभार लावते यावर शेतकरी राजा विसंबून आहे. तहसीलदार विजय बोरूडे व कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत मिळण्याची आशा आहे.