झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी – सरपंच औताडे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगाव व  संगमनेर तालुक्याला जोडणारा राज्यमार्ग दोन्ही तालुक्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Mypage

या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी पोहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी केली आहे मात्र अजूनही प्रत्यक्षात या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने काल संगमनेर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्पे यांची प्रत्यक्ष भेट घेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच अमोल औताडे यांनी केली आहे.

Mypage

संगमनेर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शिवसेना नेते नितीनराव औताडे, माजी जिल्हा परिषद प सदस्य उत्तमराव कुऱ्हाडे व सरपंच अमोल औताडे यांनी नुकताच कार्यकारी अभियंता म्हणून वर्पे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची भेट घेतली.

Mypage

कोपरगाव संगमनेर या रस्त्यादरम्यान झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची कशी दुरावस्था झाली याची माहिती दिली. झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख कोपरगाव तालुका हद्दी पर्यत या राज्य महामार्गावर अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हा रस्ता गेल्या काही वर्षापासून पूर्ण नादुरुस्त झाला आहे.

Mypage

सततच्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. कोपरगाव व संगमनेर तालुक्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्वपूर्ण असल्याने जवळपास 50 ते 60 गावांचा दररोज या रस्त्याने प्रवासाच्या दृष्टीने संपर्क येतो मात्र हा रस्ता आता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. मोठ मोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहे अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले आहे.

Mypage

पोहेगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार देखील केलेला आहे ‌ मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अजूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.

Mypage

संगमनेर ते तळेगाव पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख कोपरगाव तालुका हद्दी पर्यंत काम अजूनही सुरू झालेले नाही ही बाब शिवसेना नेते नितीनराव औताडे सरपंच अमोल औताडे व उत्तमराव कुऱ्हाडे यांनी कार्यकारी अभियंता वर्पे यांच्या लक्षात आणून दिली. झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच अमोल औताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्पे यांच्याकडे केली आहे..

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *