कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे अगोदर गाळप करा – हर्षदा काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे अगोदर गाळप करा. त्याशिवाय बाहेरचा ऊस कारखान्यांनी आणू नये अन्यथा शेतकऱ्याच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची वेळ येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी भातकुडगाव येथे केले. भातकुडगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला, यावेळी त्या बोलत
होत्या.

   काकडे पुढे म्हणाल्या, मागील वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी एकरी ५, १०  हजार रु. द्यावे लागले. शिवाय काहींचा ऊस पेटून देऊन तोडला. ऊस तोडणीस उशीर झाल्यामुळे उत्पादनात घट झाली. कारखान्यांनी अशाप्रकारे शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले.

कारखान्यांची उभारणी या तालुक्यासाठी झालेली असताना व शेतकरी सभासद असतांनाही कारखानदारांनी अगोदर बाहेर तालुक्यातील ऊसांना प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी वाट पहावी लागली व परिणामी तोडणीसाठी पैसेही द्यावे लागले. त्यामुळे चालू हंगामात कारखान्यांनी अगोदर कार्यक्षेत्रातील ऊसाचे संपूर्ण गाळप करावे. बाहेरचे ऊसाचे एक टिपरु देखील शेतकरी आणू देणार नाहीत.

       यावेळी अॅड.शिवाजीराव काकडे म्हणाले , मागील वर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना जे पैसे द्यावे लागले ते पैसे परत मिळावेत. सन २०२२-२३ च्या ऊस गळीत हंगामामध्ये शेतकऱ्याकडून ऊस तोडणीसाठी पैसे घेण्यास कारखान्याकडून प्रतिबंध करावा, या मागण्यासाठी साखर आयुक्त यांना निवेदन देणार आहोत. यावेळी सर्वांनी मारुती  मंदिरामध्ये “मी ऊस तोडणीसाठी पैसे देणार नाही” अशी शपथ घेतली.

यावेळी जगन्नाथ गावडे, उदय बुधवंत, कॉ.राम पोटफोडे, नामदेव सुसे, राम शिदोरे, भाऊसाहेब सातपुते, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, शाम खरात, भाऊसाहेब पोटभरे, रमेश दिवटे, राजेंद्र उगलमुगले, यांची भाषणे झाली. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ऊस तोडणीसाठी कसे हाल झाले याची व्यथा मांडली.

कार्यक्रमासाठी  लक्ष्मण पातकळ,  जि.प.सदस्य रामभाऊ साळवे, बाळासाहेब फटांगरे, अशोक भोसले, देविदास गिर्हे, अॅड.शंकरराव भालसिंग,  तुकाराम कापरे, बाळासाहेब जाधव, राम मुंगसे,  मधुकर गोरे, लक्ष्मणराव टाकळकर, विजय लेंडाळ, उदय बुधवंत, वैभव पूरनाळे, ज्ञानदेव पूरनाळे, विष्णु पूरनाळे, रघुनाथ सातपुते, आदि उपस्थित होते.