कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२: तिकीट मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी इतर मंडळात गुरुकुल मधील काही कार्यकर्ते गेले अशा स्वार्थी लोकांना कोपरगाव तालुक्यातील सभासद ओळखून आहेत, त्याचा गुरुकुलच्या मतदानावर काडीचाही परिणाम होणार नाही, गुरुकुलचे शिक्षक बँकेचे व विकास मंडळाचे उमेदवार मोठे मताधिक्य घेतील , असा विश्वास जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस अशोक कानडे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले बँकेच्या तिकिटासाठी इच्छुक असणे, यात गैर काहीही नाही निष्ठा महत्त्वाची असते, शिक्षक समितीने शिक्षकांची कामे केली व करत आहेत, गुरुकुल ने अनेकांची ओळख जिल्ह्यात निर्माण केली, असे असताना बँकेचे तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज होणे याचा अर्थ इतक्या दिवस दाखवलेल्या निष्ठेमध्ये भेसळ आहे, हे सिद्ध होते.
विरोधी मंडळातील उमेदवार गुरुकुल मधील एका नेत्याचा सोयरा असल्याने इतर पदाधिकाऱ्यांचा गैरसमज करून देऊन त्यांना वेगवेगळे प्रलोभन देवून गुरुकुल सोडायला भाग पाडले गेले यातील अनेकांचे राजीनामे हे खोटे आहेत. ते दबावापोटी घेतलेले आहेत. अनेक महिलांना तर वृत्तपत्रात नावे आल्यानंतरच समजले की आपण गुरुकुल सोडत आहोत.
अशी वृत्ती योग्य नाही, शिक्षक सभासद हा सुज्ञ आहे. त्यामुळे त्याला सारे समजते मला स्वतःला समिती व गुरुकुल ने जिल्ह्यात नाव दिले आहे. त्यामुळे दिलेल्या उमेदवारीवर चर्चा न करता, मी गुरुकुलसाठी कार्यकर्त्यांसहित निष्ठेने काम करणार आहे.जिल्हाभर गुरुकुल साठी अत्यंत उत्तम वातावरण असून कोपरगावच्या बाबतीत सर्वांनी निश्चिंत राहावे व इतर मंडळांनी कोपरगावची विनाकारण काळजी करू नये, अशोक कानडे आहे तोपर्यंत कोपरगाव मध्ये शिक्षक समिती व गुरुकुल हे उंचीवरच राहील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन दिवसापूर्वी प्रवेश घेतले असे दाखवलेले गुरुकुलच्या काही कार्यकर्त्यांनी ‘आम्ही गुरुकुल सोबतच आहोत असा लेखी विश्वास दिला आहे. प्रवेश घेतलेले दोन नेत्यांनी आर्थिक तडजोडी केल्या बाबतच्या चर्चा सोशल मीडियावर जिल्हाभर ट्रोल होत आहेत.