देशाच्या दरडोई उत्पन्नात किराणा व्यापारी महत्वाचा घटक – तनसुख झांबड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : किराणा व्यापारी त्यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन, व्यवहारात पारदर्शकता आणि प्रगतीसह भारतीय अर्थव्यवस्थेला गती व दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. किराणा व्यापारी हा शहराच्या नावलौकिकाबरोबरच स्वतःच्या व्यवसायाची देखील ओळख करून देत असतो. स्वतःची ओळख करून देण्याची सकारात्मक मानसिकता किराणा व्यापाऱ्यांकडे आहे.

आजचा युवा किराणा व्यापारी कोपरगाव शहराची कॅलिफोर्निया अशी असलेली ओळख पुन्हा मिळवून देतील. आपल्या जिद्द व कल्पनाशक्तीने मॉल संस्कृती कडून सकारात्मक गोष्टी स्वीकारून, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारा बदलत्या काळानुसार व्यवसायातही बदल करावेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हा.चेअरमन तनसुख झांबड यांनी केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने युवा किराणा व्यापारी प्रोत्साहन सोहळा आणि दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी तनसुख झांबड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राम बंधू मसालेचे चेअरमन हेमंत राठी, कार्यक्रमाचे अध्यक्ष किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, राजेंद्र बंब किराणा मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे, नारायण अग्रवाल, केशवराव भवर, गुलशन होडे, किरण शिरोडे, दीपक अग्रवाल आदींसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

  राम बंधु मसालेचे चेअरमन हेमंत राठी युवा किराणा व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, युवा किराणा व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काका कोयटे यांनी आयोजित केलेला सोहळा निश्चितच कौतुकास्पद आहे. कुटुंबामध्ये नेहमी आपल्या व्यवसायाबद्दल साकारातमक चर्चा करा त्यामुळे अपल्या भावी पिढीला व्यासाबाद्द्ल अभिमान व आपुलकी वाटते. व्यवसाय वाईट किंवा चांगला असा विचार केल्याने मुलांवर त्याचा परिणाम होऊन ते व्यवसायामध्ये येण्याचे धाडस करत नाही.

 दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते युवा किराणा व्यापाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे उपस्थित युवा किराणा व्यापारी भारावून गेले होते. प्रास्ताविकातून कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बंब यांनी कोपरगाव तालुक्याच्या गतवैभवाची माहिती देत युवा किराणा व्यापाऱ्यांची कोपरगावच्या विकासात पुढील भूमिका आणि कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, कोपरगाव शहरातील किराणा व्यवसायाला मरगळ आल्यासारखी वाटत होती. त्या परिस्थितीत ही कोपरगावातील युवा किराणा व्यापाऱ्यांनी मॉल संस्कृती आणि ऑनलाईन खरेदी, विक्री कशी फसवी आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान आणि कल्पनाशक्ती द्वारा कोपरगावकरांना दाखवून दिले.  तसेच त्यांनी व्यवसायात अधिकाधिक प्रगती करून कोपरगाव शहराची असलेली कॅलिफोर्निया अशी ओळख पुन्हा नव्याने निर्माण करावी.

    युवा किराणा व्यापाऱ्यांपैकी पवन डागा, पुष्पक डागा, सार्थक बंब यांनी मनोगत व्यक्त करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. पवन डागा मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी आपापसात स्पर्धा न करता आणि दुकानाच्या बाहेर किराणा मालाच्या भावांचा बोर्ड न लावता त्या बोर्डवर दररोज चांगला सुविचार लिहितो त्यामुळे दररोज ग्राहक सुविचार वाचण्यासाठी तरी मला भेट देत असतात. सर्व उपस्थितांनी पवन डागा यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. या सोहळ्याचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले. तर व्यापारी महासंघाचे नारायण अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.