कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६८ वा गळीत हंगाम सुरु
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : मागील तीन गळीत हंगामापासून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा याहीवर्षी कायम ठेवून २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला पहिला हफ्ता २५००/- रुपये देणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या वर्षाच्या ६८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. आशुतोष काळे बोलत होते.
यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, इस्माने (ISMA) चालू हंगामात देशामध्ये ४१० लाख मे.टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करून त्यापैकी इथेनॉल उत्पादनासाठी ४५ लाख टन साखरेचा वापर होऊन साखरेचे निव्वळ उत्पादन ३६५ लाख मे.टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात एकूण १४.८७ लाख हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असून मागील हंगामात १३७ लाख मे. टन साखर उत्पादन झाले असून चालू हंगामात देखील १३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. मात्र मागील तीन महिने ऊस पिकाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषणाचे ऊसाच्या मुळाचे कार्य मंदावले आहे. अति पाऊस होऊन देखील उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही.
कार्यक्षेत्रात जास्त प्रमाणात असलेल्या को -२६५ या ऊसावर इतर ऊस जातीच्या तुलनेत जास्त प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मंत्री समितीने १५ ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वत्र पडणारा पाऊस, दिवाळी सण त्यामुळे ऊस तोडणी कामगार उपलब्ध झाले नाही आदी कारणांमुळे आजमितिला ४० ते ५० साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऊस पिकांचे नुकसान झालेले दिसत नसले तरी टनेज घटण्याचा अंदाज आहे.
शेतात आजही पाणी असल्यामुळे ऊसाने भरलेली वाहने शेतातून बाहेर काढणे अवघड आहे त्यामुळे हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ऊस शेतात पाणी असल्यामुळे ऊसामध्ये साखर कमी राहील व त्याचा विपरीत परिणाम साखर उताऱ्यावर होणार आहे. सुरुवातीला साखर उतारा कमी राहील त्यामुळे जिल्हा बँकेकडून पेमेंट साठी मिळणारे ड्रॉवल कमी राहतील या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून हंगाम यशस्वी करू.
कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी आजवर ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना सदैव केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय यापूर्वी घेतले असून २०२२-२३ च्या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला (FRP) २३८० रुपये प्र.मे.टन प्रथम हफ्ता असतांना देखील पहिला हफ्ता २५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला असून यापुढेही ऊस उत्पादक शेतकरी व कामगार हिताचे असेच निर्णय घेतले जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर साखर उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर हे दबावाखाली आहेत. गेल्या वर्षी ब्राझीलचे साखर उत्पादन घटल्यामुळे भारतीय साखरेला मोठा फायदा झाला परंतु चालू हंगामात भारत व ब्राझील या दोन मोठ्या साखर उत्पादक देशांमध्ये साखर उत्पादनात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून चालू हंगामात ब्राझीलचे साखर उत्पादन वाढणार आहे. केंद्र सरकारने मागील वर्षाप्रमाणे ओपन जनरल लायसन्स (OGL) अंतर्गत साखर निर्यात करण्याकरता धोरण घ्यावे अशी साखर उद्योगाची मागणी आहे परंतु अद्याप पर्यंत केंद्र सरकारने धोरण स्पष्ट केलेले नाही.
कारखान्याच्या स्थापनेपासून जवळपास ६३ वर्षात साखर कारखान्यांच्या यंत्रसामुग्री व तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे हे बदल स्विकारून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतांना स्टीम सेव्हिंग, बगॅस बचत व उच्च प्रतीची साखर निर्माण करून साखर उत्पादन खर्च कसा कमी राहील यासाठी कारखान्याचे दोन टप्प्यात आधुनिकीकरण व यांत्रिकीकरण करण्याचा निर्णय घेतला घेतला असून चालू गळीत हंगाम नवीन मिल, नवीन बॉयलर व नवीन गव्हाणीवर घेण्यात येणार आहे. आधुनिकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची लवकरच सुरुवात होऊन पुढील वर्षी संपूर्ण कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.