बोधेगाव ‘हार्वेस्टर व मुरघास बेलर ‘ प्रकल्प शेतकऱ्यांच्या फायद्याचा – लांगोरे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी स्वस्तात पौष्टीक मुरघास उपलब्ध व्हावा. त्यातून त्याचे पशुधन वाढावे. दूध दुभत्याच्या माध्यमातून त्यास चार पैसे अधिक मिळावेत. या उद्देशाने रुरबन योजनेअंतर्गत बोधेगाव येथे सुरु होत असलेला ‘हारवेस्टर व मुरघास बेलर ‘ प्रकल्प राज्यातील सर्वप्रथम उपक्रम असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. दूध दुभते वाढवून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन अहमदनगार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी येथे केले.

बोधेगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ‘रुरबन’ योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या’ हार्वेस्टर व मुरघास बेलर’ या मशिनरी द्वारे मुरघास तयार करून तो  हवा बंद करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी लांगोरे बोलत होते.

      यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ. ज्ञानदेव कुमकर , गटविकास अधिकारी महेश टोके , सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाठ , कृषी अधिकारी राहुल कदम , बोधेगाव पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल जाधव , विस्तार अधिकारी दिगंबर भांड, हादगावचे सरपंच अरुण मातंग, बोधेगावचे सरपंच सुभाष पवळे, सोनवीहीरच्या सरपंच इंदूमती रघुनाथ काकडे, ग्रामसेवक उध्दव जाधोर, सदानंद गायकवाड, रमजू पठाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      गटविकास अधिकारी महेश डोके यांनी, ग्रामीण भागाचा विकास साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘रूरबन ‘ योजनेत  शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, हादगाव व सोनवीहीर या तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत या गावांना प्रत्येकी पाच कोटी रुपये असा एकूण १५ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे’ याच योजनेअंतर्गत सुमारे ३७  लाखाची  मुरघास तयार करण्याची ही अत्याधुनिक मशीनरी या तीन ग्रामपंचायतींना मिळाली आहे. 

या मशिनरी द्वारे शेतकऱ्यांचा तर फायदा होणारच आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीला देखील कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत प्राप्त झाला आहे. असे सांगून या योजनेअंतर्गत तालुक्यातील तीन्ही गावात झालेल्या गटारीसह रस्त्यांची, तसेच वेअर हाऊस, स्मशानभूमी, अशा विविध प्रकारच्या विकास कामांची माहिती दिली. डॉ.कुमकर यांनी मुरघासाचे फायदे सांगून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामसेवक सुनील गोरे यांनी प्रास्ताविक केले तर उध्दव जाधोर यांनी आभार मानले.