कोपरगांव प्रतिनिधी, दि.६ : देशयोगा चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली व आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांचे संयुक्त विद्यमाने निरोगी व आनंदी जीवन जगण्याची सात्विक जीवनशैली या मोफत शिबीराचे आयोजन दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ पर्यंत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये करण्यांत आलेले आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश वैज्ञानिक दृष्टीकोनातून योगिक जीवनपध्दतीचा प्रचार व प्रसार करणे हा आहे व त्यायोगे शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक निरोगी आरोग्य सर्वांना लाभावे हा आहे. प. पू. सद्गुरु आत्मा मालिक माऊली यांच्या ध्यान योगाच्या शिकवणूकी बरोबरच स्वामी विवेकानंदांनी तयार केलेल्या सात्विक जीवन शैलीचे मुल्य सर्वांचे पर्यंत पोहचवून सात्यिक जीवनशैली प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अंगिकारण्यांसाठी मदत करणे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन या दरम्यान करण्यात आलेले आहे.
या शिबीरामध्ये मुख्यत्वेकरून सात्विक आहाराच्या सवयी, विवेक क्रिया, शरीर शोधन क्रिया, सात्विक विचार क्रिया इ. विविध विषयांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक क्रिया करून घेण्यांत येणार आहे. या शिबीरात सहभागी होणारे व त्यापध्दतीने आचरण करणारे अनेक व्यक्तींचे जीवन शैलीशी निगडीत असणारे अनेक रोग औषधांशिवाय बरे झालेले आहे. आजपावेतो देश योगा टीमने आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे मदतीने दोन हजारांपेक्षा जास्त ठिकाणी या अशा कार्यक्रम / शिबीरांचे आयोजन करून सुमारे बारा लाखापेक्षा जास्त व्यक्तींना या सात्विक जीवनशैलीचा लाभ दिलेला आहे.
मधुमेह भारत छोडो, रक्तदाब भारत छोडो, मोटापा भारत छोडो, हृदयरोग भारत छोडो, बिमारी भारत छोडो अशा अनेक उपक्रमांव्दारे एक महिना कालावधीचा उपक्रम राबवून देशातील लाखो गरजू रुग्णांना या सारख्या रोगातून मुक्त करण्यांत आले आहे. देशयोगा चॅरिटेबल ट्रस्ट व आत्मा मालिक ध्यानपीठ व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे यतीने दिनांक ६ ते ११ नोव्हेंबर २०२२ या सहा दिवसांचे कालावधीमध्ये सुमारे १५०० विद्यार्थी, कर्मचारी यांसह एक हजार निवासी भाविक भक्त, साधक व एक हजार परिसरातील शिबीरार्थी या सात्विक जीवनशैली कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे. दररोज ४५ मिनिटांचे तीन सत्रांचे आयोजन होईल. यापैकी कोणत्याही एका सत्रात इच्छुकांना आपली नांवे नोंदविता येतील व हजर रहाता येईल.
याबरोबरच कोपरगांव तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी यांसह परिसरातील अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी यांचेसाठीही कार्यक्रमाचे आयोजन या दरम्यान करण्यांत आलेले आहे. आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत, पदाधिकारी व सहभागी सरकारी अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळ ९:०० वाजता आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे आत्मा मालिक जलतरण तलावाचे इमारतीमध्ये व संत महादेवी हॉलमध्ये होणार आहे.
तरी परिसरातील इच्छुक सात्विक जीवनशैलीचा अवलंब करणारे साधकांना / नागरिकांना आवाहन करण्यांत येते की, या मोफत शिबीरामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी समन्वयक श्री. चंद्रशेखर भास्कर संपर्क ८६६९६००५९५ यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे करण्यांत येत आहे.