कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगांव तालुक्यात येत्या १८ डिसेंबर रोजी २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या असून गांवपातळीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामोपचाराने सर्व निवडणुका बिनविरोध करुन ग्रामसंस्कृतीचे जतन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी केले.
सद्या संपूर्ण महराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासोबतच कोपरगांव तालुक्यातील चासनळी, वडगांव, बक्तरपूर, हंडेवाडी, मोर्विस, शिंगणापूर, खिर्डीगणेश, धारणगांव, करंजी बु., तळेगांवमळे, खोपडी, भोजडे, पढेगांव, कोळपेवाडी, माहेगांव देशमुख, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बु., डाऊच खुर्द, चांदेकसारे, सोनेवाडी, राजणगांव देशमुख, वेस सोयगांव . शहापूर, बहादरपूर, बहादराबाद या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहेत. त्यादृष्टीने गांवपातळीवर जोदार हालचाली सुरु झालेल्या आहेत.
गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी कोरोना महामारीमधे संपूर्ण जगाला विळखा घातला होता. त्यात आपल्याकडेही या महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. शेती उत्पादनाबरोबरच ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यवसाय, उद्योगधंदे अडचणीत आले होते. परिणामी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अस्थिर होऊन लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून सावरत नाही तोच यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगांव तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे नष्ट होऊन शेती उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे.
शेतकरी अडचणीत सापडले आहेत. निवडणुकांवर अनावश्यक खर्च करण्याची परिस्थिती आज राहिलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करुन ज्या – ज्या गांवात निवडणुका लागलेल्या आहेत त्या गांवातील कार्यकत्यांनी गांवपातळीवर बैठका घेऊन निवडणुका बिनविरोध कशा करता येतील याबाबत सामोपचाराने निर्णय घेणे आज काळाची गरज निर्माण झालेली आहे.
निवडणुकांसाठी होणारा खर्च टाळून तो पैसा गांवातील विधायक कामासाठी वापरला तर तो एक चांगला आदर्श ठरेल. चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. निवडणुकांच्या कालावधीत परस्परांवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे व कलहामुळे गांवातील शांतता व ग्रामसंस्कृती लयास जाणार नाही याची कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामसंस्कृतीचे जतन करण्यासाठी कार्यकत्यांनी गट – तट व हेवेदावे विसरुन निवडणुका बिनविरोध पार पाडाव्यात असेही आवाहन परजणे यांनी केले.