अहमदनगर प्रतिनिधी, दि. २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक
न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात पहिलीच समिती ठरली आहे.
राहाता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विखे-पाटील महाविद्यालयांत व नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इय्यता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लोणी येथे ९७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सवीकारून ९२ विद्यार्थ्यांना व भेंडा येथे ११६ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून १०९ विद्यार्थ्यांना जागेवरच जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले. जात पडताळणी समितीच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे प्रत्यक्ष महाविद्यालयातच जाऊन जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्याच्या ‘मंडणगड पॅटर्न’ च्या अंमलबजावणीला ही सुरूवात झाली आहे.
लोणी व भेंडा येथे घेण्यात आलेल्या या एकदिवसीय शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे होते. तर सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख, सदस्य
सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे, महाविद्यालयाचे प्राचार्य भारत वाबळे उपस्थित होते. या दोन्ही शिबिरात ५६५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कमी कालावधीत निकाली काढलेल्या प्रकरणाबाबत समितीच्या कामकाजाची स्तूती केली होती. ‘‘सेवा पंधरवड्यात राज्यात सर्वाधिक जातवैधता
प्रमाणपत्र वितरीत करण्याचे काम अहमदनगर जिल्ह्याने केले आहे. यापुढे ही समितीने असेच उत्कृष्ट काम करावे. येत्या काळात पासपोर्टच्या धर्तीवर जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे काम करण्यात येईल. ’’ अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षांच्या पूर्ती करण्याचे काम राज्यात प्रथम अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी सांगितले की, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा व ‘मंडणगड पॅटर्न’ ची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा समितीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जावून जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ही जिल्ह्यातील जास्त संख्येच्या महाविद्यालयात शिबिरांच्या माध्यमातून इयत्ता ११ व १२ च्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल.’’